Home मराठी Maha Metro । धंतोली येथे यशवंत स्टेडियम समोरील जागेवर महा मेट्रो बांधणार...

Maha Metro । धंतोली येथे यशवंत स्टेडियम समोरील जागेवर महा मेट्रो बांधणार दोन बहुस्तरीय इमारती

524

नागपूर ब्युरो : महा मेट्रोने यशवंत स्टेडियम समोरील जागेवर व्यावसायिक विकास निर्माण कार्य करण्याकरीता पुनःरचना केली आहे. या ठिकाणी आता एक टॉवर ऐवजी दोन टॉवर उभारल्या जाणार असून हे दोन्ही टॉवर पीपीपी तत्वावर उभारल्या जाणार आहे . स्थानिक बोलीदारांकडून चांगला प्रतिसाद मिळावा या करिता महा मेट्रो कडून सदर जागेवर बदल करण्यात आले आहेत.

यशवंत स्टेडियम समोरील दोन भूखंडाचे क्षेत्रफळ 77,751 व 75,696 चौ. फूट असून जमिनीचा वापर व्यवसायिक उपक्रमाकरिता आहे. महाराष्ट्र शासनाच्या ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट (टीओडी) धोरणा नुसार सदर भूखंडांचा फ्लोअर स्पेस इंडेक्स (एफएसआय) 4.0 असून भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) सुमारे 289 फूट उंची अनुमती प्रदान केली आहे. सदर 2 टॉवर्स सिताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशनला फुट ओव्हर ब्रिजच्या (FOB) साहाय्याने जोडले जातील. प्रत्येक भूखंडावर एकूण परवानगीयोग्य बांधकाम 5 लाख चौ. फूट पर्यंत असून दोन्ही टॉवर्स मध्ये मोठ्या प्रमाणात पार्किंगची व्यवस्था असणार आहे.

कंत्राटदाराला नागपूर महानगरपालिकेच्या (NMC) विकास नियंत्रण नियमावली (DCR) नुसार दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची जागा उपलब्ध करून द्यावी लागेल. तसेच महा मेट्रोला प्रत्येक टॉवरमध्ये 50 कारसाठी पार्किंगची जागा उपलब्ध करून द्यावी लागेल.

या प्रकल्पामुळे केवळ नागपूर शहराचे रूप बदलणार असून गर्दीच्या सिताबर्डी परिसरात पार्किंग करिता मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध होईल. कंत्राटदार या इमारतीमध्ये कार्यालये, रेस्टॉरंट्स, बँक्वेट हॉल, हॉटेल्स इत्यादीचे निर्माण करू शकणार तसेच टॉवर्सचा व्यावसायिक उपयोग करू शकतील.

यशस्वी कंत्राटदाराला किमान 10 कोटी रुपयांचा अग्रिम प्रीमियम आणि बांधकाम कालावधीनंतर महा मेट्रोला वार्षिक सवलत शुल्क भरावे लागेल. हे कंत्राट दारकरिता मापदंड असून दोन्ही टॉवरसाठी सवलत कालावधी 60 वर्षे आहे ज्यामध्ये स्वीकृती पत्रावर स्वाक्षरी केल्यापासून (LoA) 3 वर्षांचा निर्माण कार्य कालावधीचा समावेश आहे. या दोन्ही प्रकल्पांच्या निविदा महा मेट्रोच्या ई-निविदा पोर्टल www.mahametrorail.etenders.in वर उपलब्ध असून निविदा सादर करण्याची अंतिम तारीख 13 ऑक्टोबर आणि 14 ऑक्टोबर 2021 आहे.