Home हिंदी गणेशोत्सव : यंदा मानाचे व प्रमुख गणेश मूर्तींचे विसर्जन उत्सव मंडपातच होणार

गणेशोत्सव : यंदा मानाचे व प्रमुख गणेश मूर्तींचे विसर्जन उत्सव मंडपातच होणार

605

पुण्यातील मानाचे व प्रमुख गणपती मंडळांने यंदा गणेश मूर्तींचे विसर्जन सभा मंडप आणि मंदिरातच करण्याचा निर्णय घेतला आहे. गणेश मंडळे व नागरिकांनी देखील घरीच विसर्जन करण्याचे आवाहन या मंडळांकडून करण्यात आलं आहे. राज्यातील अनेक भागात असणाऱ्या मंडळांनी सुद्धा असेच निर्णय घेतले आहे.

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मानाच्या व प्रमुख गणपती मंडळांनी यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने व सेवा उत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार यावर्षी मानाच्या व प्रमुख गणपतींची प्राणप्रतिष्ठापना व धार्मिक कार्यक्रम अत्यंत साधेपणाने केले जात आहेत. आता श्रीं चे विसर्जन देखील सांगता मिरवणूक न होता उत्सव मंडप व मंदिरातच होणार आहे. मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळाचे अध्यक्ष व पदाधिका-यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंडळानेही यावर्षी गणपती विसर्जन मंदिरातच करण्याचा निर्णय घेतलाय. विशेष म्हणजे दगडूशेठकडून हे विसर्जन सूर्यास्ताच्या आधीच करण्यात येणार आहे. दरवर्षी पुण्याची विसर्जन मिरवणूक कित्येक तास चालते, दगडूशेठचं विसर्जन होण्यास दुसरा दिवस उजाडतो. पण यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये आणि विसर्जनासाठी लोकांनी बाहेरच पडू नये यासाठी दगडूशेठ मंडळाकडून हा पुढाकार घेण्यात आलाय.

मानाचा पहिला श्री कसबा गणपती, मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपती, मानाचा तिसरा श्री गुरुजी तालीम गणपती, मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती, मानाचा पाचवा केसरी वाडा गणपती आणि प्रमुख गणपती श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती, अखिल मंडई मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती या मंडळांनी एकत्रित येऊन हा निर्णय घेतला आहे.

सूर्यास्ताच्या आधी मानाच्या गणेश मूर्तींचे विसर्जन होणार
परंपरेप्रमाणे पुण्याचे महापौर सकाळी 10.30 वाजता श्री कसबा गणपतीला हार घालतील व त्यानंतर सकाळी 11.30 वाजता कसबा गणपतीचे विसर्जन होईल. त्याचप्रमाणे श्री तांबडी जोगेश्वरी गणपतीचे विसर्जन दुपारी 12.15 वाजता, श्री गुरुजी तालीमचा गणपती दुपारी 1 वाजता, श्री तुळशीबाग गणपती दुपारी 1.45 वाजता, केसरी वाडा गणपती दुपारी 2.30 वाजता, श्रीमंत भाऊ भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दुपारी 3.15 वाजता, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती सूर्यास्ताच्या वेळी, अखिल मंडई मंडळाचा गणपती सायंकाळी 7 वाजता विसर्जन होईल.