गडचिरोली ब्युरो : गडचिरोली जिल्हयातील तीन चतुर्थांश भुभाग हा वनव्याप्त आहे. त्यामुळे साहजिकच पिक क्षेत्राखालील जमीनीचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे दिसुन येते. तथापी, सपाट क्षेत्र पाहुन जिल्हयातील स्थानिक आदिवासी जनता वन जमीनीवरील वृक्ष तोडुन शेती करीत आहेत. परंतु तंत्रशुद्ध शेती करीत नसल्याने त्यातुन उत्पन्नाचे प्रमाणदेखील अत्यल्प असल्याचे दिसुन येते. हीच बाब लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांचे संकल्पनेतुन उदयास आलेल्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन गडचिरोली पोलीस दल व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने भामरागड तालुक्यातील महीला शेतकऱ्यांना भाजीपाला लागवडीचे प्रशिक्षण देण्यात आले.
प्रशिक्षण आटोपल्यानंतर सदर प्रशिक्षणात सहभागी झालेल्या महीला शेतकऱ्यांचा निरोप समारंभ पोलीस मुख्यालयातील ‘एकलव्य धाम’ येथे घेण्यात आला. त्यात 114 महीला शेतकऱ्यांना मान्यवरांचे हस्ते प्रमाणपत्र, भाजीपाल्यांच्या बियाणांच्या किट्स, झाडे तसेच साड्या वाटप करण्यात आल्या. पोलीस अधीक्षक अंकित गोयल सा. यांनी आपल्या मनोगतात प्रशिक्षण घेतलेल्या महीलांचे कौतुक करतांना सांगितले की, भामरागड तालुका छत्तीसगड राज्याचा सिमावर्ती भाग व त्याचा अबुजमाड परीसर म्हणजेच नक्षल्यांचा गड, लागुन असतानाही तालुक्यातील महीलांनी कोणतीही भिती मनात न बाळगता भाजीपाला लागवड प्रशिक्षण मेळाव्यास उपस्थिती लावल्याबद्दल सर्वप्रथम सर्व महिलांचे कौतुक केले. तसेच पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन गडचिरोली पोलीस प्रशासन जनतेच्या दारी पोहचले असुन, त्याचा फायदा नागरीकांनी घ्यावा असे आवाहनही त्यांनी या प्रसंगी केले.

प्रशिक्षणाचे निमीत्याने गडचिरोली मुख्यालयी येण्याची प्रथमत:च संधी प्राप्त होवुन भाजीपाला लागवडीचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळाल्याबाबत महीला शेतकऱ्यांनी गडचिरोली पोलीस दल व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापण यंत्रणा यांचे आभार मानले. गडचिरोली पोलीस प्रशासनाद्वारे आजपर्यंत पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन सुरक्षा रक्षक- 413, नर्सिंग असिस्टंट- 1111, हॉस्पीटॅलीटी- 152, ऑटोमोबाईल- 110 या प्रकारे एकुण 1786 युवक/युवतींना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे बीओआय आरसेटी व कृषी विज्ञानकेंद्र, गडचिरोली यांचे सहकार्याने ब्युटीपॉर्लर- 70, मत्स्यपालन- 25, कुक्कुटपालन- 126, शेळीपालन- 67, लेडीज टेलर- 35, फोटोग्रॉफी- 35, मधुमक्षिका पालन- 32, भाजीपाला लागवड- 114 अशा एकुण 504 युवक/युवतींना स्वयंरोजगारांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
यावेळी कार्यक्रमास अपर पोलीस अधीक्षक, (प्रशासन) समीर शेख, पोलीस उप अधीक्षक (अभियान) भाऊसाहेब ढोले, कार्यक्रम समन्वयक तथा प्रकल्प संचालक (आत्मा) संदीप कऱ्हाळे, प्रकल्प उपसंचालक (आत्मा) आबासाहेब धापते, विषय विशेतज्ञ (उदयान विभाग) सुचित लाकडे, कृषी विशेतज्ञ (अभियांत्रीकी) कृषी विज्ञान केंद्र गडचिरोली, ज्ञानेश्वर ताथोड व रितेश मालगार फिल्ड ऑफिसर इफको गडचिरोली उपस्थित होते.
भाजीपाला लागवड प्रशिक्षण मेळावा व निरोप समारंभ कार्यक्रम यशस्वी होण्याकरीता उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड कुणाल सोनवणे, प्रभारी अधिकारी पोस्टे भामरागड किरण रासकर, प्रभारी अधिकारी उपपोस्टे लाहेरी अविनाश नळेगावकर, प्रभारी अधिकारी पोमके धोडराज राजाभाऊ घाडगे त्याचप्रमाणे नागरीकृती शाखेतील प्रभारी अधिकारी सपोनि महादेव शेलार तसेच पोलीस अंमलदारांनी विशेष परीश्रम घेतले.