Home मराठी नागपूर काँग्रेसची मागणी । नागरिकांकडून कर स्वरुपात हजारो कोटी उकळणाऱ्या मनपा आयुक्तांवर...

नागपूर काँग्रेसची मागणी । नागरिकांकडून कर स्वरुपात हजारो कोटी उकळणाऱ्या मनपा आयुक्तांवर कारवाई करा

570

नागपूर ब्युरो : मनपा आयुक्त राधाकृष्ण बी यांच्यावर काँग्रेसने गंभीर आरोप केले आहेत. राधाकृष्ण बी यांनी जनतेकडून कर स्वरुपात कोट्यवधी रुपये वसूल केले आहेत, असं काँग्रेसने म्हटलंय. तसेच नागरिकांची फसवणूक केल्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीदेखील नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष आम. विकास ठाकरे यांनी केली आहे. पोलीस आयुक्तांकडे त्यांनी ही मागणी केलीय.

कर स्वरुपात कोट्यवधी रुपये वसूल केले

मागील अनेक दिवसांपासून नागपूरमधील राजकारण तापले आहे. नागपूर मनपा तर वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. सध्या नागपूरचे मनपा आयुक्त राधाकृष्ण बी यांच्यावर नागपूर काँग्रेसचे शहर अध्यक्ष आम. विकास ठाकरे यांनी गंभीर आरोप केले आहे. मनपा आयुक्त राधाकृष्ण बी यांनी मागील अनेक दिवसांपासून जनतेकडून फसवणुकीने कर स्वरुपात कोट्यवधी रुपये वसूल केले आहेत, असा आरोप विकास ठाकरे यांनी केलाय. तसेच जनतेकडून वसूल केलेले हजारो कोटी रुपये परत करावेत अशी मागणीदेखील ठाकरे यांनी केली आहे.

नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना निवेदन देतांना आम. विकास ठाकरे
कारवाई करण्याची नागपूर काँग्रेसची मागणी

याच मुद्द्याला घेऊन आम. विकास ठाकरे यांनी पोलीस आयुक्त तसेच राज्य सरकारकडे मनपा आयुक्त राधाकृष्ण यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. दरम्यान, ठाकरे यांच्या या आरोपानंतर नागपूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या आरोपानंतर नागपूरचे पोलीस आयुक्त काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मनपा आयुक्तांवर सरकारचा दबाव – भाजप

तर दुसरीकडे मनपा आयुक्तांवर महाविकास आघाडीचा दबाव आहे, असा आरोप नागपूर भाजपने केला होता. याच कारणामुळे अजूनही 550 कोटींच्या फाईल्स प्रलंबित आहेत, असा गंभीर आरोप भाजपने तीन सप्टेंबर रोजी केला होता. “नागपूर मनपात भाजपची सत्ता असल्याने महाविकास आघाडी सरकार निधीवाटपात भेदभाव करत आहे. मुद्दामहून नागपूर मनपाला निधी दिला जात नाही. नागपूर आयुक्तांकडे विविध विकासकामांच्या तब्बल 550 कोटी रुपयांच्या कामाच्या फाईल्स प्रलंबित आहेत. राज्यातील महाविकास आघाडीचा आयुक्तांवर दबाव असल्यामुळे ते या फाईली मंजूर करत नाहीत,” असा आरोप भाजप नेते अविनाश ठाकरे यांनी केला होता. तसेच आयुक्तांनी लवकरात लवकर फाईल्स मंजूर कराव्यात. अन्यथा आगामी काळात आम्ही रस्त्यावर उतरुन संघर्ष करु, असा इशाराही अविनाश ठाकरे यांनी दिला होता.