मुंबई ब्युरो : प्रथम पूजनीय गणपतीच्या गणेशोत्सवाला 10 सप्टेंबर गणेश चतुर्थीपासून सुरुवात झाली आणि बघता बघता आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याचा दिवसही उगवला. आज रविवार 19 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी गणेश चतुर्थी म्हणून साजरी केली जाते. असे मानले जाते की या दिवशी दुपारी गणपतीचा जन्म झाला होता. त्यांच्या जयंतीनिमित्त, गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत भारताच्या सर्व भागात 10 दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो. चतुर्थीच्या दिवशी बाप्पाचे भक्त गणपतीची मूर्ती त्यांच्या घरी आणतात त्यांची विशेष पूजा करतात. आज अखेर दहा दिवसांच्या गणपतीचे विसर्जन होणार आहे.
या 10 दिवसांमध्ये गणपतीला त्यांचे आवडते मोदक, लाडवांचं नैवेद्य अर्पण केले जाते. असे म्हटले जाते की गणपती दुःख दूर करणारा आणि सुख देणारा आहे. अशा स्थितीत जो कोणी या काळात प्रामाणिक अंतःकरणाने गणपतीची पूजा करतो, त्याला निश्चितच त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि त्यांच्या दुःखाचा अंत होतो.
लालबागच्या राजाचं विसर्जन, फक्त 10 कार्यकर्त्यांना परवानगी
मुंबईचा प्रसिद्ध लालबागच्या राजाचंही आज विसर्जन होणार आहे. पण, दरवर्षीप्रमाणे यंदा भव्य मिरवणूक काढली जाणार नाही. तरी गणेशभक्तांनी राजाच्या विसर्जनादरम्यान रस्त्यावर गर्दी करु नये असे आवाहन करण्यात आले आहे. लालबागच्या राजाचं आज विसर्जन होणार आहे. त्यापूर्वी सकाळी उत्तर आरती होणार आहे. त्यानंतर साडेदहा वाजताच्या सुमारास लालबागचा राजा विसर्जना करता गिरगाव चौपाटीकडे निघणार आहे. दरवर्षी ज्या मार्गावरुन लालबागचा राजा विसर्जना करता निघतो तोच मार्ग यावर्षी सुद्धा असणार आहे. पण, फक्त मंडळाच्या दहा कार्यकर्त्यांसोबत लालबागचा राजा विसर्जनासाठी निघणार आहे. मंडळाचं आवाहन आहे की लोकांनी गर्दी करु नये.
हा विसर्जन सोहळा हा सोशल मीडिया माध्यमांवर लाईव्ह दाखवला जाणार आहे. त्यामुळे गणेश भक्तांनी गर्दी करु नये असे आवाहन पोलिसांकडून आणि लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून करण्यात येत आहे, अशी माहिती लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांनी दिली.
यावर्षी अनंत चतुर्दशी 19 सप्टेंबर 2021 रोजी साजरी केली जाईल. या दिवशी गणपतीला निरोप दिला जातो. यावर्षी अनंत चतुर्दशी तिथी 19 सप्टेंबर पासून सुरु होईल आणि 20 सप्टेंबर पर्यंत असेल. गणेश विसर्जनाचा शुभ मुहूर्त जाणून घ्या-
- सकाळचा मुहूर्त – 7:39 ते 12:14 पर्यंत
- दिवसाचा मुहूर्त – दुपारी 1:46 ते दुपारी 3:18 पर्यंत
- संध्याकाळचा मुहूर्त – संध्याकाळी 6:21 ते रात्री 10:46
- रात्रीचा मुहूर्त – रात्री 1:43 ते 3:11 (20 सप्टेंबर)
- सकाळचा मुहूर्त – सकाळी 4:40 ते सकाळी 6:08 (20 सप्टेंबर)
- अनंत चतुदर्शी तिथी प्रारंभ : सकाळी 05 वाजून 06 मिनिटांनी
- अनंत चतुदर्शी तिथी समाप्ती : दुसऱ्या दिवशी सकाळी 07 वाजून 35 मिनिटांनी
राज्यभरात आज मोठ्या थाटामाटात गणपती बाप्पाला निरोप दिला जाईल. दरवर्षीप्रमाणे यंदामात्र गणपती विसर्जनाची ती धूम पाहायला मिळणार नाही. कोरोनामुळे यंदाचा गणेशोत्सवही अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. तसेच, गणपती विसर्जनासाठी मिरवणुकीची परवानगी नसल्याने अत्यंत साध्या पद्धतीने भाविक आज आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देतील. त्यासाठीची संपूर्ण तयारी प्रशासनाने केली आहे.