Home Positive Nagpur News | चौदा महिन्याच्या आस्तीक्य ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये

Nagpur News | चौदा महिन्याच्या आस्तीक्य ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये

703

15 ॲक्शन, बॉडीपार्ट, भाजीपाला, प्राण्यांची सांगितली नावे

नागपूर ब्यूरो : साधारणतः वयाच्या 15 महिन्यापर्यंत चिमुकले 5 शब्द बोलताना दिसून येतात. मात्र, 14 महिन्याच्या आस्तीक्य मृगाशिष याने चक्क 15 ॲक्शन, बॉडीपार्ट, भाजीपाला, प्राण्यांची नावे सांगून आपले नाव ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंदविले आहे. असे चमत्कारिक कर्तूत्व करणारा तो देशातील पहिलाच मुलगा ठरला आहे.

अगदी लहान वयात आई वडील चिमुकल्यांच्या हाती मोबाईल देतात. मोबाईलच्या स्क्रीन टाईममुळे चिमुकल्यांच्या भाषेवर परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे त्यांच्यातील कुठलीही गोष्ट आत्मसात करण्याची क्षमता कमी होत असते. त्यामुळे आई मृगा आणि वडील आशिष यांनी आस्तीक्यचा जन्म होताच घरातील टीव्ही आणि मोबाईल काढून घेतला. याशिवाय त्याच्याकडून विविध ॲक्टीव्हीटी करवून घेण्यास सुरुवात केली.

त्यात पझल्स, संभाषण, पॅसेजेस, भाषा याचा समावेश आहे. त्यामुळे साधारण मुले जी पाच शब्द बोलतात, तेच आस्तीक्य अधिक शब्द बोलू लागला. यातूनच मृगा आणि आशिष यांनी ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये त्याची नोंदणी केली. त्यानंतर ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’द्वारे पुराव्यांची काळजीपूर्वक पडताळणी करण्यात आली. याशिवाय रेकॉर्ड डेटाबेसमध्ये विसंगतीला वाव नसलेल्या विस्तृत तपासणीनंतर जुलै महिन्यातच त्याचे प्रात्यक्षिक घेत, त्याचे नाव ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंदविले. ऑगस्ट महिन्यात त्याबाबतचे प्रमाणपत्र आणि अवार्ड ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’द्वारे पाठविण्यात आले.

असा आहे रेकॉर्ड

आस्तिक्य मृगाशिष (जन्म 5 मे 2020 रोजी) याने ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये शरीराचे 10 भाग ओळखले. याशिवाय 5 नातेवाईक, 6 प्राणी, 4 वाहने, 5 फळे, 10 घरगुती वस्तू ओळखले व त्याची माहिती दिली. याशिवाय 15 क्रियाही त्याने विषद केल्यात. विशेष म्हणजे त्याने चार प्राण्याच्या आवाजाचेही अनुकरण केले. यावेळी त्याचे वय 14 महिन्याचे होते.