Home Education School Reopen । राज्यातील शाळा, महाविद्यालयं दिवाळीनंतर होणार सुरू, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी...

School Reopen । राज्यातील शाळा, महाविद्यालयं दिवाळीनंतर होणार सुरू, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले संकेत

557
मुंबई ब्युरो : राज्यातील शाळा नेमक्या कधी सुरू होणार? असा प्रश्न अनेकांना पडलाय. यावर राज्यातील चाइल्ड टास्क फोर्सने कोरोना स्थिती नियंत्रणमध्ये राहिल्यास शाळा दिवाळीनंतर सुरू कराव्यात, अशा सूचना शिक्षण विभागाला दिल्या आहेत. त्यामुळे राज्यातील शाळा दिवाळीच्या सुट्टीनंतर सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत याआधी शिक्षण विभागाकडून तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता त्यासोबत तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता अनेक मोठ्या शहरात शाळा सुरू करण्याचा निर्णय मागे घेण्यात आला. आता मात्र शाळा सुरू करण्याबाबत राज्य सरकराने नेमलेले तज्ज्ञ डॉक्टरांच्या चाइल्ड टास्क फोर्स सकारात्मक असून कोरोना स्थिती नियंत्रणमध्ये राहिल्यास दिवाळीनंतर शाळा सुरू करण्यास त्यांनी हिरवा कंदील दाखवला आहे.

राज्यात लवकरच शाळा, महाविद्यालये सुरू करण्याबाबत भूमिका स्पष्ट करण्यात येईल, असे संकेत अजित पवार यांनी दिले आहेत. ऑक्टोबर महिन्यात कोरोनाबाबत आढावा घेतल्यानंतर शाळा, महाविद्यालये सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

दिवाळीनंतर शाळा सुरू होणार?

कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद आहेत. ऑनलाइन वर्ग सुरू असले तरी त्याचा आता विद्यार्थ्यांना कंटाळा आला आहे. त्यात कोरोनाचा प्रादुर्भाव देखील कमी झाला आहे. नुकताच गणेशोत्सव पार पडला आहे. पुढील महिन्यात नवरात्रौत्सव, दसरा आहे. नोव्हेंबरमध्ये दिवाळी आहे. गेल्यावर्ष या दिवसांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता. राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली होती. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये कोरोना स्थितीचा आढावा घेऊन दिवाळीनंतर राज्यात शाळा सुरू करण्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

राज्यात महाविद्यालये देखील टप्प्याटप्प्यानं सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो, याबाबत देखील चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असं देखील अजित पवार यांनी यावेळी सांगितलं. लहान मुलांचं लसीकरण झाल्यानंतर शाळा सुरू करण्याची आमची मानसिकता आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. अंतिम निर्णय हा शाळा, महाविद्यालये सुरु करण्याबाबत आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील. त्यानंतर निर्णय होईल, असे ते म्हणाले.

आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू

राज्यात कोरोना नियंत्रणात आल्यानंतर टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. सध्या ग्रामीण भागात कोरोना रुग्ण नसलेल्या गावांमध्ये इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू आहेत.

तिसऱ्या लाटेचा धोका नाही

राज्यात तिसऱ्या लाटेचा (Third Wave) धोका नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात शाळा, महाविदयालये लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.