पाच ऑक्टोबर रोजी निवडणूक, सहा ऑक्टोबरला निकाल
नागपूर ब्युरो : येत्या 5 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेसाठी 79 तर पंचायत समितीसाठी 125 उमेदवार रिंगणात आहेत. नागपूर जिल्हा परिषदेतील 16 गटासाठी व 31 गणासाठी ही पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत 2 लक्ष 96 हजार 721 स्त्री मतदार व 3 लक्ष 19 हजार 292 पुरुष मतदार असे एकूण 6 लक्ष 16 हजार 016 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. एकूण 1115 मतदान केंद्रावर होणाऱ्या या मतदानात ग्रामीण भागात 863 व शहरालगतच्या 252 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे.
नरखेडमध्ये 2 गटासाठी (जि.प. मतदार संघ) 12, काटोल 2 गटासाठी 8, सावनेर 2 गटासाठी 5, पारशिवनी 1 गटासाठी 4, रामटेक 1 गटासाठी 9, मौदा 1 गटासाठी 7, कामठी 2 गटासाठी 9, नागपूर ग्रामीण 1 गटासाठी 3, हिंगणा 3 गटासाठी 16, कुही 1 गटासाठी 6 असे एकूण 16 जिल्हा परिषद मतदार संघात 79 उमेदवार रिंगणात आहेत.
तर 31 पंचायत समिती गणात 125 उमेदवार आपले नशीब अजमावणार आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानूसार धुळे,नंदुरबार,अकोला,वाशिम व नागपूर या पाच जिल्हा परिषदा व त्यातंर्गत येणाऱ्या 33 पंचायत समित्यांमधील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणूका होणार आहेत.
दि. 5 ऑक्टोबरला सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदान पार पडणार आहे. त्यानंतर बुधवार दि. 6 ऑक्टोबर रोजी मतमोजणी सकाळी 10 वाजतापासून सुरु होईल. निवडून आलेल्या सदस्यांची नावे शुक्रवार दि. 8 ऑक्टोबरपर्यंत प्रसिद्ध करण्यात येतील.
नरखेड तालुक्यासाठी रविंद्र जोगी, उपजिल्हाधिकारी, काटोलसाठी उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर, कळमेश्वरसाठी उपजिल्हाधिकारी हेमा बढे, सावनेरसाठी उपविभागीय अधिकारी अतुल म्हैत्रे, पारशिवनीसाठी उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, रामटेकसाठी उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते ,मौद्यासाठी उपविभागीय अधिकारी एस.आर. मदनूरकर कामठीसाठी उपविभागीय अधिकारी शेखर घाडगे, नागपूर ग्रामीणसाठी उपजिल्हाधिकारी जगदीश कातकर, हिंगण्यासाठी उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी, उमरेडसाठी उपजिल्हाधिकारी नितीन पाटील, कुहीसाठी उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत, भिवापूरसाठी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे हे निवडणूक निर्णय अधिकारी असतील.
या पोट निवडणुकीकरिता विभागीय आयुक्तांनी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुन भंडारा (भ्रमणध्वनी 9763738855) यांची संपूर्ण निवडणूक प्रक्रियेकरिता निवडणूक निरिक्षक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
तसेच पोट निवडणुकीसाठी असलेल्या नरखेड, काटोल, कळमेश्वर, सावनेर व पारशिवनी या तालुक्याकरीता निवडणूक निरिक्षक अधिकारी म्हणून प्रादेशिक चौकशी अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी, श्री. शैलेंद्र मेश्राम आयुक्त कार्यालय, नागपूर (भ्रमणध्वनी 9422835591) यांची नियुक्ती केलेली आहे. तसेच पोट निवडणुकी असलेल्या रामटेक, मौदा, उमरेड, कुही व भिवापूर या तालुक्याकरीता निवडणूक निरिक्षक अधिकारी म्हणून उपमहानिरिक्षक श्री. पराते मुद्रांक शुल्क नागपूर (भ्रमणध्वनी 9822472735) यांची नियुक्ती केलेली आहे.
तसेच पोट निवडणुकीसाठी असलेल्या कामठी, नागपूर (ग्रामीण), हिंगणा या तालुक्याकरीता निवडणूक निरिक्षक अधिकारी म्हणून उपायुक्त (रोहयो), तथा अपर जिल्हाधिकारी श्रीमती राजलक्ष्मी शहा नागपूर (भ्रमणध्वनी 9890452740) यांची नियुक्ती केलेली आहे.
निवडणुकीच्या संदर्भातील जिल्हयातील नागरिकांना काही तक्रारी असल्यास त्यांनी निवडणूक निरिक्षक अधिकारी यांच्यांशी संपर्क साधावा.