Home Maharashtra Nagpur News । खासदार कृपाल तुमाने यांचं सोशल मीडिया अकाऊंट हॅक, टर्किश...

Nagpur News । खासदार कृपाल तुमाने यांचं सोशल मीडिया अकाऊंट हॅक, टर्किश आर्मीचा उल्लेख

568
नागपूर ब्युरो : राजकीय नेत्यांचे सोशल मीडिया अकाऊंटस हॅक करण्याच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. नागपूर जिल्ह्यातील रामटेकचे शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांचं सोशल मीडिया अकाउंट हॅक करण्यात आलं आहे. फेसबुक व ट्विटर अकाउंट हॅक झाल्याची सकाळी माहिती पुढे आली. टर्किश सेक्युरिटी आर्मी नावाचा उल्लेख त्यात दिसून येत आहे. नागपूर सायबर सेल कडे खासदार तुमाने यांनी तक्रार देखील दाखल केली आहे.

सोशल मीडियावर सामान्य जनतेची फसवणूक होत असल्याच्या घटना वारंवार घडत असतात. आता थेट खासदाराचं सोशल मीडिया अकाऊंट हॅक झाल्याने चांगलीच खळबळ माजली आहे. खासदार कृपाल तुमाने यांचं फेसबुक आणि ट्विटर अकाऊंट हॅक झाल्यानं सायबर सेल कामाला लागला आहे.

कृपाल तुमाने यांचा परिचय 

कृपाल तुमाने यांचा जन्म 1 जून 1965 रोजी नागपुरात झाला. नागपुरात त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. त्यांच्या घरची परिस्थिती गरिबीची होती. पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झालेल्या कृपात तुमाने यांनी सुरुवातीच्या काळात बांधकाम व्यवसायिक म्हणून काम केले. त्यानंतर कृपाल तुमाने यांनी राजकारणात प्रवेश केला. इतक्या वर्षाच्या राजकीय कारकीर्दीनंतरही कृपाल तुमाने आजही तळागाळातील नागरिकांशी संपर्कात आहेत. हाच दांडगा जनसंपर्क कृपाल तुमाने यांची जमेची बाजू मानली जाते. याशिवाय, जनमानसात त्यांचा स्वत:चा असा एक वैयक्तिक करिष्माही आहे

कृपाल तुमाने यांना लहानपणापासूनच राजकारणाचे आकर्षण होते. याच आकर्षणातून त्यांनी दहावी पास झाल्यानंतर काँग्रेसचे सदस्यत्व स्वीकारले. यावेळी ते फक्त 16 वर्षांचे होते. मात्र, कृपाल तुमाने यांना काही करुन काँग्रेसमध्ये काम करायचे असल्याने त्यांनी आपण सज्ञान असल्याचे सांगितले. यानंतरच्या काळात कृपाल तुमाने यांनी सेवादल आणि युथ काँग्रेससाठी काम केले. नंतरच्या काळात कृपाल तुमाने यांना काँग्रेसमध्ये फारशी संधी मिळाली नाही. त्यामुळे कृपाल तुमाने यांनी उद्धव ठाकरे यांच्या आग्रहाखातर शिवसेनेत प्रवेश केला.

2009 मध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी कृपाल तुमाने यांना रामटेक लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक लढण्याची संधी दिली. मात्र, या निवडणुकीत काँग्रेसच्या मुकुल वासनिक यांनी कृपाल तुमाने यांचा अवघ्या 16 हजार मतांनी निसटता पराभव केला. 2014 साली कृपाल तुमाने यांना पुन्हा एकदा रामटेक मतदारसंघातून उमेदवारी मिळाली. या निवडणुकीत कृपाल तुमाने यांनी वासनिक यांच्याविरुद्ध पावणे दोन लाखांचे मताधिक्य मिळवत आपल्या पराभवाचा वचपा काढला.