राज्यात कोरोनाची संख्या कमी होत असल्याचं दिसताच राज्य सरकारकडून अनलॉकची प्रक्रिया सुरु केली जात आहे. राज्य सरकारकडून शाळा, मंदिरं आणि नाट्यगृहं सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 7 ऑक्टोबरपासून सर्व धार्मिक स्थळे उघडली जातील.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून म्हणजे 7 ऑक्टोबर पासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. या दरम्यान, कोविड सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करावे लागेल. दरम्यान राज्य सरकारने मंदिर उघडण्याचा निर्णय घेतला याचे भाजप अध्यात्मिक आघाडी, साधू, महंतकडून स्वागत केले जात आहे.
सोमवार पासून राज्यातील विद्यामंदिरं उघडणार
राज्यात 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परवानगी दिली आहे. शालेय शिक्षण विभागाने मुख्यमंत्र्यांकडे शाळा सुरु करण्यास परवानगी मागितली होती. त्यामुळे आता शाळेची घंटा वाजणार आहे. त्यानुसार आता ग्रामीण भागात पाचवी ते बारावी तर शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरु होणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. शाळा सुरु करण्याअगोदर शिक्षक आणि पालकांना प्रशिक्षण देणार असल्याचंही गायकवाड यांनी सांगितलं आहे.