Home Maharashtra Maharashtra | आर. आर. पाटलांचा सख्खा भाऊ पोलीस सेवेतून निवृत्त, शेवटच्या दिवशी...

Maharashtra | आर. आर. पाटलांचा सख्खा भाऊ पोलीस सेवेतून निवृत्त, शेवटच्या दिवशी आईला केले सॅल्युट

563
कोल्हापूर ब्यूरो : करवीरचे पोलीस उपअधीक्षक (DYSP) राजाराम रामराव पाटील हे आज पोलीस सेवेतून निवृत्त झाले आहेत. राजाराम पाटील हे राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आणि माजी मंत्री आर आर पाटील यांचे सख्खे भाऊ आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यानंतर सोमय्यांनी कोल्हापूरमध्ये जाऊन कागल तालुक्यातील मुरगूड पोलीस स्टेशनमध्ये मुश्रीफ यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यावेळी हे संपूर्ण प्रकरण राजाराम पाटील यांनी अतिशय नाजूकपणे हातळलं होतं.

राजाराम रामराव पाटील हे तात्या म्हणून परिचीत आहेत. भाऊ मंत्री होता, वहिनी आमदार, घरी मोठा राजकीय वारसा, तरीही तात्यांनी त्याचा बडेजाव कधी केला नाही. राजाराम पाटील हा पोलीस दलातील अत्यंत साधा-सरळ माणूस म्हणून ओळखले जातात. कामावरील निष्ठा आणि प्रामाणिकपणा यामुळे त्यांनी पोलीस दलात आपला वेगळा लौकीक जपला आहे.

शेवटच्या दिवशी आईला सॅल्युट

राजाराम पाटील हे आज पोलीस सेवेतील आपल्या शेवटच्या दिवसाचं कर्तव्य पार पाडत आहेत. पोलीस सेवेतील अखेरच्या दिवशी कर्तव्यावर जाताना त्यांनी आपल्या मातेला सॅल्युट करुन, कृतज्ञता व्यक्त केली. तात्यांच्या या हळवेपणामुळे, त्यांच्यातील सच्चेपणाचं दर्शन घडतं.

दोनवेळा राष्ट्रपती पदकाने सन्मान

राजाराम पाटील यांची निष्ठा आणि कामातील तत्परतेसाठी त्यांना दोनवेळा राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आलं. राजाराम पाटील यांचा सख्खा भाऊ आर आर आबा हे 12 वर्षे गृहमंत्री होते. मात्र तरीही तात्यांनी कधी त्याचा टेंबा मिरवला नाही. राजाराम पाटील हे कोल्हापुरात येण्यापूर्वी त्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून जबाबदारी पार पाडली होती. ज्यावेळी त्यांची पिंपरीतून बदली झाली, त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांच्या कारकिर्दीवर प्रकाशझोत टाकला होता. “स्वत:चा सख्खा भाऊ 12 वर्षे राज्याचा गृहमंत्री असतानाही राजाराम पाटलांनी कधी टेंबा मिरवला नाही. मात्र काही लोकांचे खूप खूप लांबचे नातेवाईक जरी गृहमंत्री असला तरी असा टेंबा मिरवला जातो, जसं काही गृहखातं हेच चालवतात. पण राजाराम पाटील त्यातले नाहीत”, असं अजित पवार म्हणाले होते.