Home Social Maha Metro । मेट्रोमुळे बापू कुटीचे दर्शन नागपुरात, स्वातंत्र्य सैनिकांचे प्रतिपादन

Maha Metro । मेट्रोमुळे बापू कुटीचे दर्शन नागपुरात, स्वातंत्र्य सैनिकांचे प्रतिपादन

526
नागपूर ब्युरो : देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्वाचे योगदान असलेल्या सेवाग्राम आश्रमातील बापू कुटीचे आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेच्या दर्शनाकरता आधी वर्धा येथे जाणे भाग होते. पण आता मेट्रोच्या एअरपोर्ट स्टेशनवर त्या कुटीची हुबेहूब प्रतिकृती आणि बापूंची प्रतिमा साकार केल्याने आता हे दर्शन नागपुरात घडते, असे प्रतिपादन ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक रतन पहाडी यांनी आज केले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त महा मेट्रो नागपूरच्या एअरपोर्ट स्टेशनवर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

महा मेट्रो नागपूर आणि विदर्भ सेवा समिती यांच्या संयुक्त सौजन्याने आजच्या या कार्यक्रमाचे आयोजन झाले होते. नागपुरात महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त सातत्याने कार्यक्रम आयोजित होतात. एअरपोर्ट स्टेशन वरील बापूंच्या प्रतिकृतीमुळे या कार्यक्रमाला आगळे-वेगळे महत्व प्राप्त झाल्याचे ते म्हणाले. 96 वर्षीय पहाडी यांनी स्वातंत्र्य लढ्यात महत्वाचे योगदान तर दिलेच होते पण खुद्द राष्ट्रपित्यांना भेटण्याचे सौभाग्य त्यांना प्राप्त झाले होते. 1945 साली झालेली त्या भेटीची आठवण करताना पहाडी भावूक झाले होते.

महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज एअरपोर्ट स्टेशनवर खादी वस्त्रांच्या स्टॉलचे रीतसर उदघाटन करण्यात आले. हा स्टॉलच्या अनुषंगाने खादी वस्त्रांची खरेदी नागपूरकरांना करता येणार आहे. या प्रसंगी बोलताना खादीचे वस्त्र मोठ्या प्रमाणात परिधान करण्याचे आवाहन या क्षेत्रात काम करणाऱ्या श्रीमती मधुबाला सिंह यांनी केले. या प्रसंगी बोलताना नागपूर विद्यापीठाच्या राज्यशास्त्र शास्त्र विभागाचे प्राध्यापक श्री व्ही के जांभुळकर यांनी देखील मेट्रो स्थानकावर सेवाग्राम आश्रमातील बापू कुटी आणि राष्ट्रपित्यांचा पुतळा साकार केल्याबद्दल महा मेट्रोला धन्यवाद दिले.

या आधी सर्व मान्यवरांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करत आदरांजली दिली. या प्रसंगी ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी आणि चित्रकार अरुण मोरघडे, आणि खादी मंडळाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. महा मेट्रो तर्फे महा व्यवस्थापक (ओ अँड एम) श्री सुधाकर उराडे यांनी कार्यक्रमाची अध्यक्षता केली. बापू कुटीच्या समोर मेट्रोच्या कर्मचाऱ्यांनी चरख्याची सुरेख रांगोळी काढली होती जी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. विदर्भ सेवा समितीचे पदाधिकारी देखील या कार्यक्रमात उपस्थित होते.