शिर्डी : घटस्थापनेपासून अर्थात 7 ऑक्टोबरपासून साई मंदिर भक्तांसाठी खुले होणार आहे. या पार्श्वभूमीवर साई संस्थानकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. संस्थानच्या नियमावलीनुसार दररोज 15 हजार भाविकांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार आहे. त्यात 5 हजार भक्तांना ऑनलाईन नोंदणीद्वारे, 5 हजार भक्तांना सशुल्क पासद्वारे तर 5 हजार भक्तांना ऑफलाईन पद्धतीने मोफत दर्शन मिळणार आहे. दर तासाला दीड हजार भाविकांना दर्शनाचा लाभ मिणार आहे.
80 भाविकांना सशुल्क प्रवेश
साईबाबांची काकड आरती, मध्यान्ह आरती, सायंआरती आणि शेजारतीला 80 भाविकांना सशुल्क प्रवेश देण्यात येईल. प्रत्येक आरतीला 10 गावकऱ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. 65 वर्षावरील नागरिकांना आणि 10 वर्षाखालील बालकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. त्याचबरोबर सर्व साई भक्तांना कोरोना नियमांचे पालन करावे लागणार आहे. मंदिरात फुलं, हार, तसंच प्रसाद घेऊन जाण्यासही मनाई करण्यात आली आहे. महत्वाची बाब म्हणजे बाहेरुन येणाऱ्या भाविकांसाठी भक्तनिवासही सुरु करण्यात येणार असल्याची माहिती साई संस्थानकडून देण्यात आलीय. साई मंदिर प्रशासनाकडून घटस्थापनेला मंदिर सुरु करण्याची तयारी पूर्ण झाली आहे, तशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिलीय.