मुंबई ब्युरो : काँग्रेस पक्ष देशातील सर्वात जुना व अनुभवी पक्ष असून देशाची लोकशाही व संविधान हे काँग्रेसच वाचवू शकते. लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी काँग्रेस पक्ष संघटना बळकट झाली पाहिजे. राज्यात काँग्रेस पक्षाला क्रमांक एकचा पक्ष करण्याचा निर्धार केला आहे, यासाठी एनएसयुआयच्या युवाशक्तीने पूर्ण ताकदीने काम करुन काँग्रेस पक्षाला गतवैभव प्राप्त करुन देण्यात योगदान दिले पाहिजे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.
टिळक भवन येथे महाराष्ट्र प्रदेश एनएसयुआयची आढावा बैठक पार पडली. या बैठकीला नाना पटोले मार्गदर्शन करत होते. ते पुढे म्हणाले की, तरुण हे देशाचे भविष्य आहेत. आपला देश हा तरुणांची जास्त संख्या असलेला देश असून देशाचे भविष्य तुमच्या हातात आहे. तुम्ही काँग्रेस पक्षाची उद्याची ताकद आहात. सामान्य माणसातून नेतृत्व उदयाला आले पाहिजे, यासाठी एनएसयुआयनेही तालुका पातळीपर्यंत जाऊन विस्तार केला पाहिजे, जनसंपर्क वाढवला पाहिजे, एनएसयुआयच्याही बुथ कमिट्या बनवल्या पाहिजेत. तुमच्यातून पक्षाचे नेतृत्व पुढे आले पाहिजे त्यासाठी ताकदीने कामाला लागा.
या कार्यक्रमाला राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, किसान काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम पांडे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस विनायक देशमुख, एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष अमिर शेख व एनएसयुआयचे पदाधिकारी उपस्थित होते.