मुंबई / नागपूर ब्युरो : उत्तर प्रदेशातील लखीमपूर इथे शेतकऱ्यांना चिरडल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्याला महाविकास आघाडीतील शिवसेना आणि काँग्रेसनेही सहमती दर्शवली आहे. लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असून, येत्या 11 ऑक्टोबरला हा बंद पुकारण्यात आला आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने 11 ऑक्टोबरला बंद करण्यात येणार असल्याचा निर्णय जयंत पाटील यांनी जाहीर केला. हा बंद पक्षाच्या वतीने आहे सरकारच्या वतीने नाही. मात्र महाविकास आघाडीमधील इतर मित्रपक्षासोबतदेखील आम्ही बोलणार आहोत की त्यांनी बंदमध्ये सहभागी व्हावं, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं. महत्त्वाचं म्हणजे जयंत पाटील यांच्या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात उपस्थित होते.
लखीमपूर घटनेचा निषेध म्हणून पक्ष म्हणून महाविकास आघाडी 11 ऑक्टोबरला बंद करणार आहोत. बुधवारी मंत्रिमंडळाने देखील याबाबात खेद व्यक्त केला आणि हुतात्मांना श्रद्धांजली वाहण्यात आली. भाजप क्रूरपणे वागून शेतकरी आंदोलन चिरडात आहे. संबंधित आरोपींना अटक देखील झाली नाही. त्यामुळे याचा देखील निषेध आम्ही करणार आहोत, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.
शिवसेना आणि काँग्रेसची भूमिका
शेतकऱ्यांचा पाठीशी शिवसेना नेहमी राहिली आहे, त्यामुळे बंदमध्ये आम्ही सहभागी होणार आहोत, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. तर शेतकरी आंदोलन चिरडताना भाजपची मानसिकता दिसून आली, जनरल डायरच्या भूमिकेत भाजप दिसून आली, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.
महाविकास आघाडी तर्फे नागपुरात “महाराष्ट्र बंद”
राष्ट्रवादी काॕंग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिका-यांना सूचना देण्यात आली आहे कि, लखीमपुर (उ.प्र)येथे शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून चिरडणाऱ्या केंद्र सरकार चा निषेध कण्याकरिता महाविकास आघाडी ने सोमवार दि. 11 ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्र बंद पुकारलेला आहे त्या अनुषंगाने नागपुरातील सहा विधानसभा क्षेत्रातील एका मुख्य जागेवर सर्वच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, नेते एकत्रित येऊन बाजारपेठ बंद करणे, आवागमन बंद करणे, चक्काजाम आदी कार्य संयुक्तपणे पार पाडतील. भाजपाच्या सरकार विरोधात हा बंद यशस्वी करण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे. अशी माहिती राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी नागपुर चे अध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी दिली आहे.
त्या करीता खालील प्रकारे निर्धारीत स्थळी सकाळी 10 वाजता “बंद” चे आंदोलन आयोजन करण्यात आले आहे.
- 1) पूर्व नागपूर : गुलशन मुनियार, जगनाडे चौक
- 2) पश्चिम नागपूर: शैलेश पांडे, व्हेरायटी चौक
- 3) उत्तर नागपूर: महेंद्र भांगे, कमाल चौक
- 4) दक्षिण नागपूर: सुखदेव वंजारी, दीनानाथ पडोळे, लक्ष्मी सावरकर, सक्करदरा चौक
- 5) मध्य नागपुर : रिजवान अंसारी, रमण ठवकर, नूतन रेवतकर, शिव भेंडे
इतवारी सराफा बाजार चौक - 6) दक्षिण-पश्चिम: मुन्ना तिवारी, छत्रपती चौक