नागपूर ब्यूरो : देवता लाईफ फाउंडेशनतर्फे 2 ऑक्टोबरपासून सुरू झालेली वंदे मातरम रक्तदान महारॅली विजयादशमी, 15 ऑक्टोबरला नागपुरात परतणार आहे. या रॅलीअंतर्गत राज्यातील जिल्ह्या-जिल्ह्यात घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागपुरात 2 ऑक्टोबरला वंदे मातरम रॅलीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हिरवी झेंडी दाखविली. त्यानंतर वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलडाणा या मार्गे आणि जिल्ह्या-जिल्ह्यात ठिकठिकाणी रक्तदान शिबिर घेण्यात आले. महाराष्ट्रातील 36 जिल्हे, 3600 किलोमिटरचे अंतर 14 दिवसात पूर्ण करीत ही रॅली परत येत आहे.
देवता लाईफ फाउंडेशनने 12 जिल्ह्यात रक्तदान व 24 जिल्ह्यात जनजागृती करीत एक लाख लोकांचा रक्तदान महायज्ञ राबविला. या महायज्ञाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी देवताची झेंडी दाखविली. सोबतच या रॅलीमध्ये कॉमेडी हीरो जॅानी लिव्हर ह्याने स्वतः उपस्थित राहून जनजागृती केली. तसेच रक्तदान मोहिमेत सहभागी होण्यासाठी त्याने लोकांना प्रेरित केले, असे देवता लाईफ फाऊंडेशनचे किशोर बावणे यांनी सांगितले.
या रॅलीसाठी देवता लाईफ फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर बावणे, कस्तुरी बावणे, सारिका पेंडसे, सुधीर बाहेती, नीलिमा बावणे, फोटो जर्नलिस्ट शेखर सोनी, कीर्तीभाई जसानी, मोहन तोडवानी, शशिशेखर देशपांडे, अनिल नेवारे, शशांक गुराडे आदि पदाधिकाऱ्यांसह ठीक ठिकांच्या ब्लड बँकेचे मोलाचे सहकार्य लाभले.
Devta Life Foundation | रक्तदान जनजागृती राज्यस्तरीय रॅलीला राज्यपालांनी दिल्या शुभेच्छा