Home Farmer #Maharashtra । शेतात चक्क हर्बल गांजा पिकविण्याची मागितली परवानगी, अजब मागणीने प्रशासन...

#Maharashtra । शेतात चक्क हर्बल गांजा पिकविण्याची मागितली परवानगी, अजब मागणीने प्रशासन चक्रावले

506
बुलढाणा ब्युरो : सामाजिक राजकीय संघटनांसह सामान्य व्यक्तींकडून निवेदनाद्वारे आपल्या न्याय हक्कासाठी विविध मागण्या शासन व प्रशासनाकडे केल्या जातात, हे आपल्यासाठी काही नवीन नाही. मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एका एकर शेतात चक्क हर्बल गांजा पिकविण्याची परवानगी मागितली एवढेच नव्हे तर त्यासाठी बियाणे शासनाने उपलब्ध करून द्यावे अशी आग्रही मागणी सुद्धा केली आहे. ह्या अजब तऱ्हेच्या निवेदनानंतर प्रशासन तर चक्रावले आहेच मात्र हि बाब सध्या चर्चेचा विषय सुद्धा झालेली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मधुकर शिंगणे, जुल्फिकार शेख व सतीश मोरे शेतकरी चळवळीत गत अनेक वर्षांपासून काम करणारे स्वाभिमानी कार्यकर्ते आहेत. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन गाजविणाऱ्या राजू शेट्टी व रविकांत तुपकर यांच्या या कार्यकर्त्यांनी देऊळगावराजा येथील तहसीलदार यांच्या दालनात एक निवेदन घेऊन एन्ट्री केली त्यावेळी अतिवृष्टी मुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी या मागणीसाठी त्यांनी महसूल कार्यालय गाठले.

दरम्यान तहसीलदार श्याम धनमने यांनी निवेदन स्वीकारून त्यावर नजर टाकली त्यावेळी त्यांचा ग्रह चुकीचा ठरला. निवेदनातील विषय आणि मागणी अनपेक्षितच नव्हे तर चक्रवणारी होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजीपाला, कडधान्य उत्पादनाची शेती परवडत नाही, शेतीमालाला बाजारात भाव नाही, शासनाचा हमीभाव नसल्याने शेती तोट्यात जात आहे अशी विविध कारणे सांगून शेतातील एका एकर वर चक्क हर्बल गांजा उत्पादनाची परवानगी देण्यात यावी अशी मागणी केली. एवढेच नव्हे तर गांजा पिकाचे बियाणे शासनाने उपलब्ध करून द्यावे असा आग्रह ही धरला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे शासना कडे केलेल्या अजब मागणी ने प्रशासन ही चक्रावले आहे.

महाराष्ट्र राज्याचे मंत्री नवाब मलिक यांचे जावई यांच्या शेतात हर्बल गांजाचे पीक सापडल्याची बातमी मागील आठवड्यात राज्यभरात प्रसारमाध्यमातून झळकली असतांना देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी सदर प्रकार सुगंधी हर्बल वनस्पती असल्याचे वक्तव्य केले. या वक्तव्या नंतर शेतकऱ्यांना बिकट परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी एका एकरीत हर्बल गांजा पिकविण्याची परवानगी देण्याची उपरोधक मागणी सदर निवेदनात बोल्ड अक्षरात नमूद केली गेली आहे.

चंद्रपुरातील शेतकऱ्याची ही सरकारकडे मागणी, ग्रामसभे कडे केला अर्ज

चंद्रपूर ब्युरो : राज्यासह देश आणि जगावर कोरोनाचं संकट आहे. या संकटामुळे अनेकांवर आर्थिक संकट कोसळलं. पण राज्यात आलेल्या आसमानी संकटामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक कंबरडंच मोडलं आहे. अतिवृष्टीमुळे शेतकरी हतबल झाले आहेत. सरकारने या शेतकऱ्यांना मदतीचं आश्वासन दिलंय. पण त्यांच्यापर्यंत जोपर्यंत मदत मिळेल तोपर्यंत काय? असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांना सतावतोय. अशा परिस्थितीत उद्विग्नतेतून चंद्रपुरच्या एका शेतकऱ्याने सरकारकडे थेट गांज्याची शेती करण्यास अनुमती द्यावी, अशी विनंती केली आहे. शेतकऱ्याने ग्रामसभा, तहसीलदारांना याबाबतचा अर्ज देखील दिला आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात शेतकऱ्याच्या या मागणीची चर्चा आहे.

शेतकऱ्याचं नेमकं म्हणणं काय?

चंद्रपूर जिल्ह्यातील नूकसानग्रस्त शेतकर्‍याने सरकारला विचित्रच विनवणी केली आहे. आपल्या 2 एकर शेतीत सतत नुकसान होत असल्याने गांजा पिकविण्याची परवानगी द्यावी. शेतकऱ्याच्या या मागणीमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. गोंडपिपरी तालुक्यातील डोंगरगाव येथील शेतकरी साईनाथ फुलमारे यांनी डोंगरगाव ग्रामसभेत यासाठी थेट अर्जच सादर केला आहे. गांजा शेती करु देण्याचा विनंती करणारा अर्ज त्याने शेतीच्या विपरीत परिस्थितीमूळे घेतला आहे.

ग्रामसभेने अर्ज स्वीकारला, पण कायदेशीर बाजू तपासणार

जिल्ह्यात सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे सोयाबीन आणि धान शेती सडल्याचा या शेतकऱ्याचा दावा आहे. कुटुंब पालनपोषणासाठी शासनाकडून मदत मिळत नसल्याने गांजा शेतीची परवानगी त्याने मागितली आहे. तहसीलदार-कृषी विभाग आणि वरिष्ठ अधिकार्‍यांना त्याने हा विनंती अर्ज पाठविला आहे. ग्रामसभेने या अर्जासंदर्भात अर्ज स्वीकारत कायदेशीर बाजू तपासून प्रकरण निकाली काढू, अशी माहिती दिली आहे.

गांजाच्या शेतीला देशात बंदी

देशात गांजाच्या शेतीला बंदी आहे. अंमली पदार्थ आणि सामाजिक मुद्द्याच्या पार्श्वभूमीवर गांजाच्या शेतीला देशात बंदी आहे. पण राज्यास देशात बऱ्याचदा गांजाच्या शेती केल्याच्या बातम्या समोर येतात. गांजा प्रचंड किंमतीत विकला जातो. त्यामुळे आरोपींकडून गांजाच्या तस्करी केली जाते. त्याविरोधात पोलिसांकडून कठोर कारवाई केली जाते. काही दिवसांपूर्वी औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील नालेगाव येथे एका शेतकऱ्याने तुरीच्या शेतात गांजा लावला होता. हा कारनामा त्याला चांगलाच महागात पडला होता. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तब्बल 157 किलो गांजा तसेच तब्बल 9 लाख रुपये जप्त केले होते.

#maharashtra । भीमा कोरेगाव प्रकरणी परमबीर सिंह आणि रश्मी शुक्ला यांना आयोगाकडून नोटीस