नागपूर : कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मेट्रो प्रवासी सेवा बंद असली तरी ऑरेंज आणि अँक्वा लाईन मार्गिकेवरील मेट्रो स्टेशन अनलॉक होण्यास सज्ज झाले आहेत. तसेच शहरातील अन्य मेट्रो स्टेशनचे निर्माण कार्य जलद गतीने सुरु आहे. याच अनुषंगाने आज महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.ब्रिजेश दिक्षित यांनी एलएडी चौक, शंकर नगर मेट्रो स्टेशनची पाहणी करून या मेट्रो स्टेशनचे कार्य जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
मुख्य बाब म्हणजे नुकतेच रहाटे कॉलोनी, अजनी चौक तसेच बंसी नगर मेट्रो स्टेशनचे निर्माण कार्य पूर्ण झाले असून सदर मेट्रो स्टेशन प्रवासी सेवेकरिता सुसज्ज झाले आहे. पाहणी दरम्यान डॉ.दीक्षित यांनी बंसी नगर मेट्रो स्टेशनच्या पूर्ण झालेल्या कामाची पाहणी केली व व्यावसायिक सेवेच्या निमित्ताने तयार असलेल्या या मेट्रो स्टेशन बद्दल समाधान व्यक्त केले.
निर्माण कार्यस्थळी सूरक्षेवर भर द्या
कोरोना चा प्रकोप बघता निर्माण कार्यस्थळी कामगारांची योग्य ती काळजी घेण्याचे महा मेट्रोच्या सेफ्टी चमूला सुचवले व वेळोवेळी निर्माण कार्य ठिकाणी योग्य औषध फवारणी, कामगारांचे तापमान तपासणे व मास्कचा उपयोग करून आवश्यक असे सोशल डिस्टंस पाळून कार्य करण्याचे निर्देश दिले.
लवकरच होणार सीएमआरएसची पाहणी
ऑरेंज आणि अँक्वा लाईन मार्गिकेवरील रहाटे कॉलोनी,अजनी चौक,बंसी नगर आणि एलएडी चौक प्रवासी सेवा करिता सज्ज झाले असून या ४ मेट्रो स्टेशनची पाहणी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त यांची चमू लवकरच करणार असून डॉ. दीक्षित यांनी दिलेल्या निर्देशानुसार सिव्हिल कार्य, इलेक्ट्रिकल कार्य तसेच स्टेशन येथील सोई सुविधा करीता मेट्रो अधिकारी स्टेशन परिसरात कार्यरत आहे.
यावेळी संचालक (प्रकल्प) महेश कुमार यांनी व्यवस्थापकीय संचालक यांना मेट्रो स्टेशनची सविस्तर माहिती प्रदान केली. यावेळी संचालक (वित्त) एस शिवमाथन, कार्यकारी संचालक (प्रशासन) अनिल कोकाटे, कार्यकारी संचालक (रिच-३) अरुण कुमार तसेच प्रकल्प संचालक (जनरल कन्सलटंट) रामनाथन व इतर अधिकारी उपस्थित होते.