गडचिरोली ब्युरो : जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारतांना अशा धमक्या येण्याची शक्यता आपण आधिच गृहीत धरली होती. नक्षल्यांच्या धमक्यांना आपण भीक घालत नाही. जिल्ह्याच्या विकासासाठी आपण सतत प्रयत्नशील असून विकास हेच नक्षलवाद समाप्तीचे प्रमुख लक्षण आहे आणि जिल्ह्यातील नागरिकांना आता ते समजून चूकले आहे. त्यामुळे नक्षल्यांना कुणीही सहकार्य करीत नाही अशा परिस्थितीत धास्तावलेल्या नक्षल्यांची ही भ्याड कृती होय, असे राज्याचे नगर विकास मंत्री तथा गडचिरोली आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. ते गडचिरोलीत विविध कार्यक्रमांसाठी आले असताना पत्रकाराच्या प्रश्नाला ते उत्तर देत होते.
शनिवारी त्यांनी गडचिरोली पोलिसांच्या पोलिस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून मत्स्य पालन, भाजीपाला व फळबाग लागवड प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना प्रमाणपत्र व किटचे वितरण टु-व्हिलर, फोर व्हिलरचे लायसन्स वाटप, कोविड मध्ये सर्वोत्तम काम करणाऱ्यांचा सत्कार व आत्मसमर्पितांना भुखंड वाटपाच्या कार्यक्रमात उपस्थित होते. यावेळी त्यांनी पोलिस बांधवांसोबत दिवाळी साजरी करून शुभेच्छा दिल्या.
#गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात जवळपास दोनशे लोकांना विविध प्रमाणपत्र, लायसेन्स, शेती साहित्य तसेच आत्मसमर्पित नक्षलींना सदनिकेचे वाटप केले. pic.twitter.com/Gy5UVxr4fd
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 30, 2021
यावेळी ते म्हणले की गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना आत्मनिर्भर करणे, आत्मसमर्पितांचे पुनर्वसन करून त्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करणे हे पोलीस आणि प्रशासनाचे प्रयत्न आहेत. गडचिरोली भेटी दरम्यान पालकमंत्र्यांनी ज्या भामरागड तालुक्यातून त्यांना धमकीचे पत्र आले त्या तालुक्यातील अतिदुर्गम आणि शेवटच्या टोकावर असलेल्या धोडराज पोलीस मदत केंद्राला भेट दिली व दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. गडचिरोली पोलिस दलाच्या दादालोरा खिडकी या उपक्रमाचे कौतुक करून अभिनंदन केले.
पालकमंत्र्यानी सकाळी आल्यानंतर सर्वप्रथम चामोर्शी तालुक्यातील चपराळा अभयारण्य परिसरात वनविभागाच्या अधिकाऱ्यांसोबत भेट देऊन हत्तींच्या संरक्षित अधिवासासंदर्भात वनविभागाकडे असलेले प्रारूप समजून घेतले व त्यावर अंमलबजावणी कशी करता येईल या संदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
नक्षली कारवायांमुळे अतिसंवेदनशील असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भगात सणवार सोडून आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस जवानांना यावेळी #दिवाळी च्या खास शुभेच्छा देऊन फराळाचे वाटप केले. pic.twitter.com/HXpTMSy9K6
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 30, 2021
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार, जिल्हाधिकारी संजय मीणा, खासदार देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, सीईओ कुमार आशीर्वाद, पोलिस अधिक्षक अंकित गोयल, मुख्य वनसरंक्षक किशोर मानकर यासह पोलिस, कृषी आणि इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते.