Home Award @socio_culture । सुनील वाघमारे यांचा ‘युनिक’ विश्वविक्रम, सलग 401 दिवस गायन

@socio_culture । सुनील वाघमारे यांचा ‘युनिक’ विश्वविक्रम, सलग 401 दिवस गायन

697

डॉ. दंदे फाऊंडेशनच्या वतीने जाहीर सत्कार


नागपूर ब्युरो : सुप्रसिद्ध गायक सुनील वाघमारे यांनी सलग 401 दिवस दररोज दोन तास गायन करून आणखी एका विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. युनिक बुक आफ रेकॉर्डमध्ये त्यांच्या या विक्रमाची लवकरच नोंद घेण्यात येणार आहे. सुनील यांच्या गौरवार्थ डॉ. दंदे फाऊंडेशनच्या वतीने कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला. महाराष्ट्र बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र व पदक डॉ. दंदे यांनी सुनील यांना प्रदान केले. यावेळी सुनिल यांच्या पत्नी इंदिरा उपस्थित होत्या.

शंकरनगर येथील साई सभागृहात आयोजित या सोहळ्याला डॉ. दंदे फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. पिनाक दंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर विदर्भ गौरव प्रतिष्ठानाचे अध्यक्ष गिरीश गांधी आणि खादी व ग्रामोद्योग आयोगाचे केंद्रीय सदस्य जयप्रकाश गुप्ता यांची विशेष उपस्थिती होती. सुनिल यांनी गेल्यावर्षी 25 सप्टेंबरला गायन सुरू केले. दररोज दोन तास फेसबुक लाईव्हवर गायन करून सुनिल यांनी जगभरातील हजारो श्रोत्यांना रिझवले.

401 दिवसांमध्ये त्यांनी साडेपाचशेहून अधिक गाणी गायली. यात हिंदी चित्रपटसृष्टीतील जवळपास सर्व गायकांची व संगितकारांची गाणी त्यांनी सादर केली. शनिवारी त्यांनी 401 दिवस पूर्ण केले. सुनील यांनी ‘बडी दूर से आये है प्यार का तौफा लाए है’ या गाण्याने विक्रमी दिवसाच्या गायनाला प्रारंभ केला. दोन तास गायन झाल्यानंतर सुनिल यांचा कौतुक सोहळा घेण्यात आला. यावेळी संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी तसेच मोहम्मद रफी फॅन्स कल्चरल क्लबचे सदस्य आवर्जुन उपस्थित होते. सूत्रसंचालन राजू व्यास आणि सलीम शेख यांनी केले.

सुनीलमध्ये कमालीची जिद्द – डॉ. दंदे

सुनीलमध्ये कमालीची जिद्द आहे. त्याने एकदा निर्धार केला की तो मागे बघत नाही. तो हाडाचा कलावंत आहे. मोहम्मद रफी यांच्यावर त्याची निस्सीम श्रद्धा आहे, याचे कौतुक आहे. कोरोना काळात सुनीलने हा पराक्रम केल्याबद्दल त्याचे विशेष अभिनंदन, अश्या भावना डॉ. पिनाक दंदे यांनी व्यक्त केल्या.

निराशेवर मात

कोरोनामुळे सांस्कृतिक क्षेत्रही शांत झाले होते. अश्यात काही कलावंतांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तर काहींना कमालीचे नैराश्य आले. तर काहींनी उदरनिर्वाहासाठी पर्यायी व्यवसाय निवडला. सुनिल यांनाही काही प्रमाणात नैराश्य आले होते. पण हताश होणाऱ्यांमध्ये त्यांचा समावेश होत नाही, याची जाणीव डॉ. पिनाक दंदे यांनी सुनील यांना करून दिली. त्यानंतर सुनील यांनी युनिक रेकॉर्ड करण्याचा निर्णय घेतला व डॉ. दंदे यांच्यासह अनेकांनी त्याला मदतीचा हात दिला. 401 दिवस जिद्दीने आपला प्रवास करून सुनिल यांनी निराशेवर मात केली, याचे सर्वांनीच कौतुक केले.

विक्रमवीर सुनील

सुनील वाघमारे यांनी 2012 मध्ये सलग 105 तास मॅराथॉन गायन केले होते. त्याची नोंद गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड, लिमक बुक आफ रेकॉर्ड्स आणि युनिक बुक आफ रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली होती. त्यानंतर 2014 मध्ये सुनील यांनी सलग 50 तास धार्मिक ग्रंथाचे वाचन केले. त्याची नोंद इंडिया बुक आफ रेकॉर्ड्सने घेतली. राज्य शासनानेही सुनिल यांचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार देऊन गौरव केला आहे.

म्हणून विक्रमाची तयारी – सुनील

मी आज जो काही आहे तो डॉ. दंदे यांच्यामुळे आहे. माझे यापूर्वीचे विक्रमही त्यांच्यामुळेच शक्य झाले, अशी भावना सुनील यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘गेल्यावर्षी कोरोनाने घात केला. सारे काही थांबले. पण गाण्याशिवाय राहू शकत नाही. त्यामुळे इंटरनेटवर शोधले. तिथे मला भूजमध्ये एकाने १३४ दिवसांचा विक्रम केल्याचे दिसले. त्यानंतर मी हा विक्रम करण्याचा निर्धार केला.’

#CREDAI | क्रेडाई के प्रतिष्ठित प्रॉपर्टी एक्सपो का आज अंतिम दिन, रविवार होने से ज्यादा लोग आने की उम्मीद