मुंबई ब्युरो : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. तब्बल 12 तासांच्या चौकशीनंतर अनिल देशमुखांवर ईडीकडून ही कारवाई करण्यात आली आहे. अनेक दिवसांच्या अज्ञातवासानंतर अनिल देशमुख सोमवारी (1 नोव्हेंबर) दुपारी स्वतः मुंबईतील ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले होते. दरम्यान, आता मध्यरात्री 12 तासांच्या चौकशीनंतर अखेर अनिल देशमुख यांना अटक करण्यात आल्याची माहिती आहे.
अनिल देशमुख ईडीच्या अधिकाऱ्यांना चौकशीदरम्यान सहकार्य करत नसल्याचं कारण देत ही अटक करण्यात आल्याची माहिती मिळते. दरम्यान, खरंतर सोमवारी ईडी कार्यालयात हजर राहण्यापूर्वी शेअर केलेल्या एका व्हिडीओत अनिल देशमुखांनी “आपण चौकशीदरम्यान ईडीला संपूर्ण सहकार्य करू” असं म्हटलं होतं. मात्र, प्रत्यक्षात तसं घडलं नसल्याने अखेर आता ईडीने अनिल देशमुखांना 100 कोटींच्या वसुली आदेशाप्रकरणी अटक केली आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता निश्चितच भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.
Former Maharashtra Home Minister Anil Deshmukh arrested in connection with extortion and money laundering allegations against him: ED officials
(file photo) pic.twitter.com/uVLEBNk8kL
— ANI (@ANI) November 1, 2021
मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्याप्रकरणी तब्बल 5 वेळा समन्स बजावूनही अनिल देशमुख ईडीसमोर चौकशीसाठी हजर झाले नव्हते. तब्बेत आणि वयाचं कारणे देत वारंवार अनिल देशमुखांनी ईडीसमोर जाणं टाळलं होतं. मात्र, अनेक दिवसांनंतर सोमवारी दुपारी देशमुख स्वतः ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले. यावेळी अनिल देशमुख यांनी आपण चौकशीला संपूर्ण सहकार्य करू असं सांगत मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंहांवर आरोपही केले. माझ्यावर आरोप करणारा गायब पण मी हजर झालो आहे असं यावेळी देशमुखांनी बोलून दाखवलं.
परमबीरसिंह यांच्या आरोपांमुळे अनिल देशमुख मोठ्याअडचणीत सापडले. “अनिल देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना पैसे गोळा करण्यासाठी टार्गेट देत होते. मुंबईतील बार रेस्टॉरंटमधून 100 कोटी रुपयांची वसुली करायला सांगायचे”, असे गंभीर आरोप परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर केले होते.