गडचिरोली ब्युरो : महाराष्ट्राच्या पूर्व भागात काॅग्रेसला अधिक मजबूती प्रदान करण्यासाठी राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या गडचिरोली या आदिवासीबहुल आणि अतिदुर्गम जिल्ह्यापासून सुरूवात करून सुर्यमुखी विकासाची पावलं उचलली आहेत. काॅग्रेसचे या नोंदणी अभियानात आगामी तीन महिण्यात एक कोटीपेक्षा अधिक सदस्यांची नोंदणी केली जाईल या करिता काॅग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याने घराघरापर्यंत पोहोचून हे अभियान यशस्वी करावे असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काॅग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.
गडचिरोली जिल्हा काॅग्रेस कमिटीच्या वतीने सोमवार, १ नोव्हेंबर २०२१ रोजी सदस्य नोंदणी अभियान व काॅग्रेस कार्यकर्ता मेळावा आणि जिल्हा काॅग्रेस कमिटीच्या अध्यक्षांचे पदग्रहण समारोह असा कार्यक्रम आयोजित केला होता. या मेळाव्यात नाना पटोले बोलत होते. या वेळी मंचावर आपत्ती व्यवस्थापन व बहुजन कल्याण मंत्री ना. विजय वडेट्टीवार, विधानपरिषद सदस्य अभिजित वंजारी, प्रदेश काॅग्रेसचे सचिव डाॅ. नामदेव उसेंडी, माजी खासदार मारोतराव कोवासे, पत्रकार बाळ कुलकर्णी, माजी आमदार आनंद गेडाम, काॅग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्यासह विविध पदाधिकारी आणि वरिष्ठ नेते प्रामुख्याने उपस्थित होते.
नाना पटोले पुढे म्हणाले की, कॉंग्रेसच देशाला तारू शकते. काॅग्रेस जवळ इतिहास, भविष्य आणि वर्तमान आहे. केंद्र सरकार आणि त्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१४ मध्ये स्वप्न विकून सत्ता प्राप्त केली. मात्र लोकांचा आता भ्रमनिरास झाला आहे. इंधनासह देशातल्या सर्वच जीवनावश्यक वस्तुंच्या किमतीत वाढ केल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र आक्रोश आहे. मोदी सरकार विदेशनीती, देशांतर्गत निती, शेतकरी कामगारांच्या समस्या, उद्योग आणि व्यापार यासह इतर सर्वच आघाड्यांवर नापास झाले असून सरकारची ही विफलता जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम कॉंग्रेस कार्यकर्त्याने पोहचवावे असे त्यांना आवाहन केले.
काॅग्रेस जेव्हा स्वातंत्र्याची लढाई लढत होती तेव्हा देशभक्ती सांगणाऱ्यांनी इंग्रजांशी हात मिळवनी केली आणि आता केंद्रातील सत्तेतले लोक देशभक्तीच्या नव्या व्याख्या देशाला सांगत आहेत. काॅग्रेस विचारांचे लोकंच खरे देशभक्त होते, आहे, आणि पुढेही राहणार आहेत. समन्वयातून आणि एकत्र होऊन काॅग्रेस कार्यकर्त्यांनी राज्यात निवडणुकांमध्ये योगदान दिल्यास काॅग्रेसची एकहाती सत्ता आणल्याशिवाय राहणार नाही, असे वक्तव्य यावेळी विजय वडेट्टीवार यांनी केले.
कार्यकर्ता मेळाव्यात नाना पटोले व विजय वडेट्टीवार यांनी काॅग्रेस सदस्यता अर्ज भरून पहिली सदस्यता स्वीकारली. विविध पक्षांच्या नेत्यांनी काॅग्रेसमध्ये यावेळी प्रवेश केला. तर जिल्हाध्यक्षांचे पदग्रहण संपन्न झाले. मेळाव्याला हजारोंच्या संख्येत काॅग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.