नागपूर ब्युरो : अलिकडे वाघ आणि बिबट्याचा वावर कमी झाला म्हणून की काय, नागपुरात आता मगर मुक्कामाला आली आहे. तीही धरमपेठेतील पत्रकार सहनिवासाला लागून असलेल्या नाल्यामध्ये. ही मगर थोडी पाण्याच्या वर येऊन आराम करत असताना काही स्थानिक मुलांना दिसली. त्यांनी तिचा व्हिडिओ काढून व्हायरल केला.
मानद वन्यजीव रक्षक अविनाश लोंढे व कुंदन हाते यांनी याला दुजोरा दिला. काही दिवसांपूर्वी झालेल्या तुफानी पावसात वेणा नदीतून जुळलेल्या नाल्यातून मगर आली असावी असा कयास हाते व लोंढे यांनी व्यक्त केला.
नाल्यात मगर असल्याची तक्रार मिळाल्यानंतर वनविभागाची टीम दोन-तीनदा घटनास्थळावर जाऊन आली. परंतु या टीमला मगर आढळली नाही. वनविभागाची चमू घडामोडींवर लक्ष ठेवून आहे. या मगरीचा थेट नागरिकांशी संबंध नाही आणि त्यांना त्रासही नाही. त्यामुळे आली तशी ती काही दिवसांनी निघून जाईल, असे लोंढे यांनी सांगितले.
दरम्यान, काल रात्री चंद्रपूर जिल्ह्यातील एका गावात शिकारचा पाठलाग करताना एक वाघ चक्क शेतात घुसला. तसेच एका विहिरीत पडला. बाहेर निघता नाही आल्याने तो रात्रभर तेथेच अडकला. वरोरा तालुक्यात असलेल्या आल्फर रस्त्यावरील गमन शिरपाते या शेतकऱ्याच्या शेतात रविवारी रात्री ही घटना घडली.
या घटनेची माहिती सकाळपर्यंत वाऱ्यासारखी पसरली. यानंतर घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली. वन विभागाला याची माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले. परंतु, बघ्यांची मोठी गर्दी असल्याने सुरुवातीला बचावकार्यात अडथळे येत होते. मात्र, रेस्क्यू टीमने शर्थीचे प्रयत्न करून अखेर वाघाला सुखरूप बाहेर काढले.
जबरदस्त डिमांड में है रामायण एक्सप्रेस से जुड़ा आई.आर.सी.टी.सी. का पैकेज, जानिए इसकी खासियत