Home Maharashtra #Gadchiroli | नक्षलवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून विकासाच्या मुख्य प्रवाहात यावे: पालकमंत्री एकनाथ...

#Gadchiroli | नक्षलवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून विकासाच्या मुख्य प्रवाहात यावे: पालकमंत्री एकनाथ शिंदे

545

पोलिस आणि C-60 पथकाने शनिवारी मोठी नक्षलवाद विरोधी कारवाई केली. या मोहिमेत पोलिसांनी तब्बल 26 नक्षलवाद्यांना ठार केले आहे. गडचिरोली पोलिसांच्या कामगिरीनंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिसांचे कौतुक केले आहे. गडचिरोली पोलिस आणि सी 60 जवानांचे त्यांनी मनापासून अभिनंदन केले आहे. विकासाला अडथळा आणणाऱ्या नक्षली कारवायांचा शासन कठोरपणे बिमोड करेल असा निर्धार त्यांनी केला आहे.

एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, ‘कोरची तालुक्यातील मरदिनटोला जंगलात गडचिरोली पोलिसांच्या सी 60 पथकाच्या जवानांनी शनिवारी 13 नोव्हेंबर रोजी 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे. गडचिरोली पोलिस आणि सी 60 जवानांचं मनापासून अभिनंदन. पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेचं देखील हे मोठं यश आहे. या कारवाईत चार पोलिसही जखमी झाले असून त्यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरू आहेत. शासन त्यांच्या उपचारामध्ये कुठलीही कमतरता ठेवणार नाही. नक्षलवाद्यांविरोधातली कारवाई यापुढेही अशाच पद्धतीने सुरू ठेवली जाईल. गडचिरोलीचा विकास करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध आहे.’ असेही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, ‘विकासाला अडथळा आणणाऱ्या नक्षली कारवायांचा शासन कठोरपणे बिमोड करेल. शरणागती पत्करून मुख्य प्रवाहात येऊ इच्छिणाऱ्या नक्षलवाद्यांच्या पुर्नवसनासाठी शासनाचं धोरण आहे. त्यामुळे हिंसेचा मार्ग सोडून विकासाच्या मुख्य प्रवाहात नक्षलवाद्यांनी यावं, असं पालकमंत्री या नात्याने आवाहन करतो.’ असे म्हणत एकनाथ शिंदेंनी नक्षलवाद्यांना आवाहन केले आहे.

अशी झाली कारवाई

आतापर्यत 26 मृतदेह हाती लागले असून जंगलात शोधकार्य सुरू आहे. त्यात आणखी एखादे दोन नक्षल्यांचे मृतदेह हाती लागण्याची शक्यता गडचिरोलीचे एस. पी. अंकित गोयल यांनी दिली. सकाळी 6 ते दुपारी 2.30 अशी साडे आठ तास चकमक चालली. यात सी-60 तुकडीचे पाच जवान जखमी झाले. त्यांना उपचारार्थ नागपुरला हलवण्यात आले आहे.

माहितीनुसार, सी-60 जवान काही गावांमध्ये शोध मोहीम राबवत असताना त्यांना जंगलात मोठ्या प्रमाणात नक्षलवादी आल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार कमांडो तुकड्यांनी नक्षल्यावर सकाळी 6 वाजताच्या सुमारास हल्ला चढवला. यात पोलिस व नक्षल्यांत तुंबळ लढाई झाली. कोरची येथील सी-60 कमांडोच्या 5 व गडचिरोली येथील दहापेक्षा अधिक अशा सुमारे 200 जवानांनी नक्षल्यांना डोके वर काढू दिले नाही. दोन्ही बाजूंनी तुफान गोळीबार झाला. यात 26 नक्षली ठार झाल्याची माहिती गोयल यांनी दिली.

#Gadchiroli । सह्याद्री उर्फ मिलिंद तेलतुंबडेसह 26 नक्षलवादी ठार, ओळख पटविण्यासाठी घेतली जात आहे माजी नक्षलवाद्यांची मदत