नागपूर ब्युरो : आपण कुरियरने किंवा ऑनलाईन पद्धतीने वस्तू मागवतो. बॉक्समध्ये पॅकिंग करुन या वस्तू आपल्या घरी येतात. मात्र याच बॉक्समधून वस्तूऐवजी कोब्रा निघाला तर…. असंच काहीसं नागपुरात घडलंय. नागपुरातील ज्ञानेश्वर नगर परिसरात राहणाऱ्या सुनील लखेटे यांच्यासोबत असंच काहीसं घडलं.
लखेटे यांची मुलगी बंगळुरुमध्ये नोकरीला आहे. मात्र कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून ती नागपुरातील घरातूनच काम करत आहे. त्यामुळे लखेटे यांनी बंगळुरुमधील घर मुलीचं रिकामं केलं. तेथील एका परिचित व्यक्तीच्या माध्यमातून आठ बॉक्समध्ये सामान पॅक करुन नागपूरला मागवलं. बंगळुरुहून आलेले हे 8 बॉक्स कुरियर कंपनीच्या गोदामात होते. तिथून हे बॉक्स काल (सोमवारी) संध्याकाळी लखेटे यांच्या घरी पोहोचले.
लखेट यांनी हे बॉक्स उघडले आणि साहित्य घरात ठेवले. पण चौथा बॉक्स उघडताना त्यांना सापाची फुत्कारी ऐकू आली. त्यावेळी शंका आलेल्या लखेटे यांनी सावध होऊन पाहिलं आणि बॉक्स उघडला. मात्र त्यातील एक बॉक्स उघडला असता त्यातून कोब्रा बाहेर पडला. त्यानंतर एकच पळापळ झाली. घाबरलेल्या लखेटे कुटुंबियांनी तो बॉक्स घराबाहेर नेला. तिथून हा कोब्रा नाल्यात गेला. त्यानंतर लखेट कुटुंबियांनी सर्पमित्रांना या प्रकाराबाबत माहिती दिली. सर्पमित्रांनी कोब्राला शोधण्याचा प्रयत्न केला. पण कोब्रा मात्र सापडला नाही. मात्र हा कोब्रा बॉक्समध्ये कसा आला? हे अद्याप समजू शकलं नाही.
विशेष म्हणजे, ज्या बॉक्समधून साप निघाला त्या बॉक्सच्या खाली छिद्र असून त्यातूनच सापाने बॉक्समध्ये प्रवेश केला असू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र साप थेट बंगळुरूमधून नागपुरात आलाय की, कुरिअर कंपनीच्या नागपुरातील गोदामातून बॉक्समध्ये शिरला, हे स्पष्ट झालेलं नाही.