राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे बुधवार म्हणजेच 17 नोव्हेंबरपासून चार दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर असणार आहेत. आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी आता सर्वच पक्षांची मोर्चेबांधणी सुरू आहेत. दरम्यान राष्ट्रवादीने मिशन विदर्भ सुरू झाल्याचे दिसत आहेत. जवळपास दोन वर्षांनी शरद पवारांचा हा दौरा होत आहे. शरद पवार यांच्या दौऱ्यामुळं विदर्भातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळणार आहे.
राष्ट्रवादीने आता महानगरपालिका निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष हे चार दिवस विदर्भ दौऱ्यावर आहेत. यावेळी चार दिवसांमध्ये ते नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. विदर्भ हा भाजपचा गड मानला जातो. हा गड काबिज करण्यासाठी त्यांनी मिशन विदर्भ सुरू केले आहे.
पवार आज दुपारी एक वाजताच्या सुमारास नागपुरात पोहोचणार आहेत. त्यानंतर ते व्यापाऱ्यांसोबत बैठक, पत्रकार परिषद आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत. त्यानंतर साडेपाच वाजता वर्धमाननगर येथील सात वचन लॉन येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.