नागपूर ब्युरो : विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांचे बुधवार, 17 नोव्हेंबर ला पहाटे दोन वाजता निधन झाले. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. वेगळ्या विदर्भाचे शिलेदार गेल्याची भावना व्यक्त होत आहे.
राम नेवले हे मूळचे नागपूर जिल्ह्यातील नरखेडचे. 8 ऑक्टोबर 1951 मध्ये त्यांचा जन्म झाला. नरखेडमध्ये त्यांचे कृषी सेवा केंद्र होते. 1984 मध्ये ते शेतकरी संघटनेच्या संपर्कात आले. शेतकरी संघटनेचे नागपूर जिल्हाध्यक्ष म्हणून राम नेवले यांनी कारकीर्द सुरू केली. शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेत होते. त्यानंतर ते तिथून बाहेर पडले. राम नेवले यांनी संपूर्ण आयुष्य वेगळ्या विदर्भासाठी वाहून घेतले. वेगळ्या विदर्भासाठी होणाऱ्या आंदोलनांचे नेतृत्व केले.
राम नेवले यांनी महानगरपालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यासाठी जय विदर्भ पार्टीची स्थापना केली होती. पण, त्यात त्यांना फारसे यश आले नाही. तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य शेतकऱ्यांना मिळालेच पाहिजे, यासाठी त्यांचा आग्रह होता. त्यांच्या नेतृत्वात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सरकारने लावलेली बंदी झुगारण्यात आली. एचटीबीटी बियाण्याची लागवड करण्यात आली. एका कृषी मासिकाचे संपादनही केले. त्या माध्यमातून शेतीतील वेगवेगळे प्रयोग शेतकऱ्यांपर्यंत पोहचविले.
राम नेवले यांच्या पत्नीचे चार वर्षांपूर्वी कर्करोगाने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक विवाहित मुलगी असा परिवार आहे. राम नेवले यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाट येथे दुपारनंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कृषी, सामाजिक यांसह इतर क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित होते. वेगळ्या विदर्भासाठी खंबीरपणे लढणार एक लढाऊ आणि खंबीर नेतृत्व गेल्याचं योगेश गिरडकर यांनी त्यांच्या फेसबूक अकाउंटवर म्हटले आहे.