Home मराठी महापालिकेतील ‘किंग मेकर’ अजातशत्रू सरदार अटलबहादूर सिंग यांचे निधन

महापालिकेतील ‘किंग मेकर’ अजातशत्रू सरदार अटलबहादूर सिंग यांचे निधन

638

महापालिकेतील ‘किंग मेकर’ म्हणून ओळखले जाणारे अजातशत्रू सरदार अटलबहादूर सिंग यांचे शुक्रवार १९ रोजी गुरूनानक जयंतीदिनी निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. ते तीनदा नागपूरचे महापौर होते. ३ मार्च २०१७ रोजी त्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त भावपूर्ण सत्कार करण्यात आला होता. “शहरात रक्ताची एकही व्यक्ती नाही, विद्यापीठात एकही शिख मतदार नाही. परंतु सिनेटवर सलग २१ वर्षे निवडून आलो. नागपूरकरांनी भरभरून प्रेम दिले आणि सेवा करण्याची संधी दिली’, असे भावोद्गार त्यांनी त्यावेळी काढले होते. “मराठी ग्रामसेवक’ नावाचे मराठी नियतकालिक ते चालवत होते. कडबी चौक निवासस्थानाहून उद्या शनिवार, २० रोजी दुपारी १२ वाजता अंत्ययात्रा निघून वैशाली नगर घाटावरअंत्यसंस्कार करण्यात येईल.

मराठी शिकण्यासाठी लावली शिकवणी
मराठी भाषा शिकण्यासाठी त्यांनी शिकवणी लावली होती. एका शिक्षकाकडे मराठी भाषेची शिकवणी लावली. त्यावेळी महिन्याला ३० रुपये याप्रमाणे शुल्क होते. महिन्याच्या शेवटी ३० रुपये दिल्यावर त्या शिक्षकांनी १६ रुपये परत केले. असे त्यांनी का केले असे विचारले तेव्हा त्यांनी मी केवळ १४ दिवस शिकवणीला आलाे, असे सांगितल्याची आठवण सरदार अटल बहादूरसिंग यांनी सांगितली होती. अटलबहादूर सिंग यांच्याकडे माणसे जोडण्याची कला होती. त्यांची प्रत्येक क्षेत्रात मुशाफिरी होती. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, साहित्य अशा सर्व क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान होते. त्यांच्यामुळेच नागपुरात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा सत्कार होऊ शकला. लता मंगेशकर यांनी नागपुरात येण्यास नकार दिला होता. परंतु अटल यांच्यामुळे त्या तयार झाल्या होत्या.

बविद्यापीठाची पदवी मराठी, इंग्रजीत
अटल बहादूर सिंग यांच्या आग्रहामुळे तत्कालीन कुलगुरू भाऊसाहेब कोलते यांच्या काळात नागपूर विद्यापीठाची पदवी मराठीत देण्यास सुरुवात झाली. अटल बहादूर सिंग आणि मोहब्बतसिंग तुली यांनी पदवी मराठी भाषेत देण्याची मागणी केली होती. त्यावर कोलते यांनी मराठी भाषेतून पदवी दिल्यास आंतरराष्ट्रीय पातळीवर अडचण होईल, असे सांगितले. परंतु दोघांचा आग्रह पाहून त्यांनी मराठी आणि इंग्रजीत पदवी देण्याचा मार्ग काढला.