मुंबई ब्युरो : भारतीय लघू उद्योग विकास बँकेने (SIDBI) गुगल इंडियासोबत करार केला आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना म्हणजेच MSME ला सवलतीच्या व्याजदरावर एक कोटी रुपयांपर्यंतचे आर्थिक सहाय्य देण्यासाठी दोन्ही संस्था एकत्र आल्या आहेत. सीडबी आणि गुगल इंडियानं सोशल इम्पॅक्ट लेंडिंग प्रोग्राम सुरू केला आहे. गुगल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडनं सीडबी सोबत करार केला आहे.
भारतीय लघू उद्योग विकास बँकेने यासंदर्भात एक निवेदन जारी केलं आहे. गुगल सोबतच्या या भागीदारीमध्ये कोविड-19 महामारीमुळं निर्माण झालेल्या संकटातून बाहेर पडण्यासाठी हा करार करण्यात आलाय. लघू उद्योजकांना अर्थसहाय्य म्हणून सुमारे 110 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे, असं सांगण्यात आलं आहे
25 लाख ते 1 कोटींपर्यंतचं कर्ज मिळणार
या अंतर्गत 25 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंत कर्जपुरवठा करण्याचं धोरण असल्याचं सीडबीनं म्हटलं आहे. सीडबीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शिवसुब्रमण्यम रमन म्हणाले की, “आम्ही या करारामुळे लघू उद्योग क्षेत्राला पतपुरवठा करण्याच्या प्रयत्नांना बळ देऊ शकतो. गुगल इंडिया सोबत आम्ही हे लक्ष्य निश्चितपणे साध्य करू शकू असंही, शिवसुब्रमण्यम रमन म्हणाले.
भारतासारख्या मोठ्या आणि विस्तीर्ण प्रदेशाच्या विकासाच्या गरजांची सखोल माहिती असलेल्या SIDBI सोबत हातमिळवणी करत असल्याचं गुगल इंडियाचे उपाध्यक्ष संजय गुप्ता म्हणाले. सीडबीच्या उपक्रमात सहभागी होऊन आम्हाला आनंद होत असल्याचं गुप्ता म्हणाले.