मराठवाड्यातील 863 ग्रामपंचायतींमधून 1249 ग्रामपंचायत सदस्यपदांसाठी पोटनिवडणुका घेतल्या जाणार आहेत. त्यासाठी (दि.22) नोव्हेंबरपासून आदर्श आचारसंहिता लागू होणार आहे. तर या निवडणुका आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची नांदी ठरणार आहे.
मराठवाड्यात ग्रामपंचायत सदस्यांचे निधन, राजीनामा तसेच इतर कारणांवरून काही ग्रामपंचायत सदस्यपद रिक्त झाले होते. या रिक्त जागांवर पोटनिवडणुका घेण्याचा निर्णय राज्याच्या निवडणूक विभागाने जाहीर केला आहे.
त्यानुसार मराठवाड्यातील 863 ग्रामपंचायतींमधून 1249 ग्रामपंचायत सदस्यांच्या जागा रिक्त असून या जागांसाठी निवडणूक घेतली जाणार आहे. याबाबतचा कार्यक्रम निवडणूक विभागाने जाहीर केला आहे. त्यानुसार सोमवारी (दि.22) संबंधित तहसीलदार यांच्याकडून निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध केली जाणार असून त्याच दिवसापासून पोटनिवडणूक असलेल्या ग्रामपंचायतींमधून आदर्श आचारसंहिता लागू होणार आहे. दरम्यान, या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासोबतच उमेदवारांना जात प्रमाणपत्र तसेच जात पडताळणी समितीची वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असेल.
जि.प. व पंचायत समितीच्याही होणार निवडणुका
या निवडणुकीनंतर लगेचच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे गावपातळीवरील पुढारीदेखील या निवडणुकीसाठी सज्ज होऊ लागले आहेत. मात्र ग्रामपंचायत पोटनिवडणुका आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची नांदी ठरणार असल्याचे बोलले जात असून या निवडणुकीवरूनच आगामी निवडणुकीतील राजकीय पक्षांचे भवितव्य काही प्रमाणात का होईना कळणार असल्याचे बोलले जात आहे.
कुठे, किती जागांसाठी निवडणूक
- जिल्हा -एकूण ग्रा.पं. -ग्रा.पं.सदस्य निवडणूक
- औरंगाबाद 128-185
- बीड -123-181
- नांदेड -198-301
- उ.बाद -119-179
- परभणी -53-66
- जालना -70-83
- लातूर -127-202
- हिंगोली -45-52