अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांना मागे टाकून आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान पटकावला आहे. अंबानी २००८ मध्ये प्रथमच देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले होते. त्यानंतर प्रथमच त्यांनी मानाचा हा मुकुट गमावला आहे. रिलायन्सच्या शेअर्समध्ये घसरण आणि अदानी समूहाच्या शेअर्सची उसळी यामुळे अंबानी मागे पडले. अर्थात, या दोन्ही उद्योगपतींच्या निव्वळ संपत्तीची आकडेवारी जाहीर झालेली नाही.
सौदी अरामकोशी करार फिसकटल्याने बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी रिलायन्सचे शेअर्स घसरले. गेल्या महिन्यात ते २,७५० रु. पातळीवर होते. आता ते २,३५१ रुपयांवर आहेत. बाजार भांडवल एक महिन्यापूर्वी १८.४८ लाख कोटी होते. ते आता १४.९१ कोटी आहे. कंपनीत अंबानी कुटुंबाचा वाटा ५०.६% आहे. म्हणजे संपत्ती सुमारे १.६८ लाख कोटींनी कमी झाली. अदानींची वाढली. ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्सनुसार, मंगळवारपर्यंत अंबानींची संपत्ती अदानींपेक्षा फक्त १६ हजार कोटींनी अधिक होती. बुधवारी शेअरमधील चढ-उतारानंतर ती निश्चितपणे कमी झाली आहे.
अदानी यांचा व्यवसाय वेगवेगळ्या कंपन्यांत विभागलेला आहे. त्यामुळे कंपन्यांच्या कामगिरीचा परिणाम थेट शेअर्सवर पडतो. तर, रिलायन्स इंडस्ट्रिजचा व्यवसाय एकाच कंपनीनुसार आहे. यात एखादा व्यवसाय चांगली कामगिरी करत असेल तरी त्याचा परिणाम त्या शेअर्सवर तत्काळ दिसत नाही. जियोजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांच्यानुसार, अंबानींनी कंपन्यांची विभागणी केली नाही तर आगामी कित्येक वर्षे ते अदानींच्या मागेच राहू शकतात. गुंतवणूकदार म्हणून मला वाटते की अंबानींनी व्यवसायाची विभागणी करावी.