232 दिवसांपासून बेपत्ता असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि सध्याचे डीजी होमगार्ड परमबीर सिंह गुरुवारी अचानक मुंबईत प्रकट झाले. त्यांनी प्रथम गुन्हे शाखेचे कार्यालय गाठून डीसीपी नीलोत्पल यांच्यासमोर जबाब नोंदवला. सिंह यांच्याविरुद्ध गोरेगावमध्ये दाखल झालेल्या खंडणीच्या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेचे पथक करत आहे. याप्रकरणी सिंह यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते, काही दिवसांपूर्वी त्यांना फरार घोषितही करण्यात आले होते.
बुधवारी चंदीगडमध्ये अचानक त्यांचा फोन ऑन झाला होता. तेव्हापासून परमबीर लवकरच मुंबई पोलिसांसमोर हजर होण्याची शक्यता वर्तवली जात होती. यापूर्वी परमबीर सिंह यांना मोठा दिलासा देत सर्वोच्च न्यायालयाने तपासात सहकार्य करण्याच्या अटीवर त्यांच्या अटकेला स्थगिती दिली होती.
त्यावेळी त्यांच्या वकिलाने न्यायालयात सांगितले होते की, परमबीर सिंह यांना या संपूर्ण प्रकरणात गोवले जात आहे. ज्या अधिकाऱ्यांना त्यांनी भ्रष्ट कारभारासाठी शिक्षा केली तेच अधिकारी आज तक्रारदार बनले आहेत. परमबीर यांच्या जीवाला मुंबईत धोका आहे, त्यामुळे ते शहराबाहेर असल्याचेही कोर्टात त्यांच्या वकिलाने सांगितले होते. त्यांच्यावर आतापर्यंत 5 गुन्हे दाखल आहेत.