Home Maharashtra विधीमंडळाचे अधिवेशन । हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत होणार, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत...

विधीमंडळाचे अधिवेशन । हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत होणार, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

571

मुंबई/ नागपूर ब्युरो : विधीमंडळाचे यंदाचे हिवाळी अधिवेशन हे नागपूर ऐवजी मुंबईतच होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. आज मंत्रिमंडळाची बैठक झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर शस्त्रक्रिया झाल्यानंतर ते अजूनही रुग्णालयातच उपचार घेत आहेत. त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला ते ऑनलाईन उपस्थित होते.

जुलैमध्ये पावसाळी अधिवेशन संपतानाच हिवाळी अधिवेशनाची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार 7 डिसेंबर 2021 रोजी नागपूर येथे विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन होईल असा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, या अधिवेशनाला काही दिवस शिल्लक असताना नागपूरमध्ये अधिवेशनाच्या तयारीसाठी कोणत्याही प्रकारच्या हालचाली झाल्या नव्हत्या. त्यामुळे मागील काही दिवसांपासून यंदाचे हिवाळी अधिवेशन देखील नागपूर ऐवजी मुंबईलाच होईल असा तर्क लावला जात होता. अखेर हा अंदाज खरा ठरला आहे.

सलग दुसऱ्या वर्षी संसदेचे हिवाळी अधिवेशन हे नागपुर ऐवजी मुंबईत होणार आहे. सोमवारी अधिवेशना संदर्भात BAC ची बैठक होणार आहे. त्यात अधिवेशनाची तारीख अंतिम केली जाईल. अधिवेशन मुंबईतच होणार आहे. 22 ते 28 डिसेंबरपर्यंत अधिवेशन होणार आहे. गेल्या वर्षी देखील नागपूर येथे होणारे हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्यात आले होते.

नागपूर करारानुसार वर्षातून एक तरी अधिवेशन नागपुरात घेणे बंधनकारक आहे. मात्र मागील वर्षी कोरोनाचा धोका लक्षात घेता गेल्या वर्षीचे अधिवेशन देखील नागपूर ऐवजी मुंबईत घेण्यात आले होते. विशेष म्हणजे गेल्या वर्षीचे हिवाळी अधिवेशन हे दोनच दिवसात आटोपण्यात आले होते. त्यामुळे विरोधकांना सत्ताधारींवर प्रश्न विचारण्यास कालावधी अत्यंत कमी होता.

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांनी हिवाळी अधिवेशन नागपूरातच घेण्यात यावे अशी मागणी केली होती. मात्र मुख्यमंत्र्यांच्या शस्त्रक्रिया आणि विधान परिषद निवडणुकीचे कारण देत यंदाचे अधिवेशन देखील मुंबईत होणार आहे.