राज्य सरकारने 1 डिसेंबरपासून पहिली ते चौथी आणि सातवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यास मंजुरी दिली. आता जिल्हानिहाय परिस्थितीचा आढावा घेऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय होत आहे. त्यानुसार, मुंबईत 1 डिसेंबर नव्हे तर 15 डिसेंबरपासून शाळा सुरू होत आहेत. मुंबई महापालिका शिक्षण अधिकाऱ्यांनी पहिली ते सातवी वर्गाच्या शाळा सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव मुंबई महापालिका आयुक्तांकडे पाठवला.
त्यावर चर्चा केल्यानंतर मुंबई महापालिका अंतर्गत येणाऱ्या शाळा या 1 तारखेपासून सुरू करता 15 डिसेंबरपासून सुरू करण्यात यावा असा निर्णय घेण्यात आला आहे. शाळा सुरू होईपर्यंत ऑनलाईन वर्ग सुरूच राहणार असल्याचे देखील पालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
मुंबईत शाळा सुरू करायच्या की नाही? याबाबत पालिका आयुक्त आणि शिक्षणाधिकारी यांच्यात आज बैठक पार पडली. या बैठकीत मुंबईतील शाळा 15 डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यात 1 डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, मुंबईत महापालिकेने शासन आदेश येऊनही शाळा सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय घेतला नव्हता. त्यामुळे शिक्षक-पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.
औरंगाबादमध्ये 5 डिसेंबरनंतर निर्णय
औरंगाबादमध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही. महानगरपालिकेच्या शिक्षण अधिकाऱ्यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितल्याप्रमाणे, यासाठी 5 डिसेंबरपर्यंत वाट पाहिली जाणार आहे. एकूण परिस्थितीचा आढावा घेऊन त्यानंतरच महापालिका आयुक्त निर्णय घेऊ शकतात.
शाळा सुरू करण्याबाबतचे आदेश सरकारने दिल्यानंतर शिक्षण विभागाने मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
- दोन विद्यार्थ्यांमध्ये शक्यतोवर किमान सहा फूट अंतर ठेवावे.
- शाळेमध्ये प्रत्येकाने मास्क घालणे बंधनकारक आहे.
- वारंवार हात धुवावे व शाळेत स्वच्छता ठेवावी.
- शाळा सुरू करताना विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्याने शाळेत बोलवावे.
- शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्यांचे लसीकरण पूर्ण झालेले असावे.
- शाळांमध्ये बायोमेट्रिक उपस्थितिची पद्धतीचा अवलंब करू नये.
- शाळेत गर्दी होणार नाही असे उपक्रम, खेळ किंवा सामूहिक प्रार्थना टाळाव्यात.
- ज्यांना कोणतीही लक्षणे नाहीत अशाच व्यक्तींना शाळेच्या आवारात किंवा वर्गात येण्यास अनुमती नसावी.
- मुले किंवा शिक्षक आजारी असेल तर त्यांनी शाळेत येऊ नये, आवश्यक नियमांचे पालन करावे.
- क्वारंटाईन विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाची सोय उपलब्ध असावी.
- शाळेतील एकाच वर्गातील पाचपेक्षा अधिक मुले दोन आठवड्याच्या कालावधीत कोरोनाबाधित आढळल्यास शाळेतील कोव्हीड प्रतिबंधक कृती योजनेचा सखोल आढावा घ्यावा.
- शाळांची वेळोवेळी निर्जंतुकीकरण करावे.
- शाळेत येताना किंवा शाळा सुटल्यावर अथवा मोकळ्या वेळेत मुलांनी एकत्र येऊन नियमांचा भंग करू नये.
- यामध्ये ज्या शाळेत विद्यार्थी संख्या जास्त असेल त्यामुळे जास्तीत जास्त पंधरा ते वीस विद्यार्थी एका वर्गात बसतील.
- एका बेंचवर एक विद्यार्थी बसेल अशाप्रकारे नियोजन करावे सोबतच विद्यार्थी संख्या जास्त असलेल्या शाळांमध्ये दोन सत्रांमध्ये शाळा भरवण्यात यावी.
- शहरी भागात महापालिका आयुक्त व इतर ठिकाणी जिल्हाधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद मुख्याधिकारी, नगर परिषद यांनी शिक्षणाधिकारी, आरोग्य अधिकारी यांच्यासमवेत सातत्याने आढावा घेऊन आवश्यक संबंधित सूचना कराव्यात.
- या आधीच्या टप्प्यांमध्ये ज्याप्रकारे ग्रामीण भागात शाळा सुरू करण्यासाठी सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली तर महापालिका क्षेत्राकरिता आयुक्त व नगरपालिका, नगरपंचायती, ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आले आहेत. त्या समितीने शाळा सुरू करण्यापूर्वी चर्चा करावी.
- पालकांच्या संमती शाळेत येण्यासाठी आवश्यक असणार आहे, पालकांचे संमतीनेच विद्यार्थी शाळेत येऊ शकेल.