मुंबई ब्युरो : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. काही दिवसांपूर्वीच एचएन रिलायन्स रुग्णालयात त्यांच्या मणक्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. आज सकाळी चाचणी केल्यानंतर उद्धव ठाकरेंना डिस्चार्ज देण्यात आला. रिलायन्स हॉस्पिटलचे डॉ. अजित देसाई आणि डॉ. शेखर भोजराज यांनी उद्धव ठाकरेंवर शस्त्रक्रिया केली होती. रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर सुपुत्र आदित्य ठाकरे यांच्यासह ते वर्षा या शासकीय निवासस्थानी रवाना झाले.
गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांना मान आणि मणक्याचा त्रास जाणवत होता. अनेक कार्यक्रमात त्यांनी मानेला पट्टा लावून हजेरी लावली होती. हा त्रास वाढल्यामुळे त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित राहणे टाळले होते.
12 नोव्हेंबर रोजी सर्व्हायकल स्पाईन संबंधित यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. गिरगावातील एच. एन. रुग्णालयात ही शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर आज त्यांना सुट्टी देण्यात आली असून, ते आदित्य ठाकरे सोबत वर्षावर रवाना झाले आहेत.
बैठकीत लावली होती व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी
दक्षिण आफ्रिकेत आढळेल्या कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन विषाणूमुळे राज्य सरकार सतर्क झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यापार्श्वभुमीवर पार पडलेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रुग्णालयातूनच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीला हजेरी लावली होती. रुग्णालयात असतानाही मुख्यमंत्री ठाकरेंनी कामाचा धडाका कायम ठेवला आहे.