संपूर्ण जगभरात सावट असणाऱ्या ओमायक्रॉन कोरोना विषाणूचा मुंबईत शिरकाव झाल्याचा दाट संशय आहे. मुंबईत गुरुवारी ओमायक्रॉनचे १० संशयित रुग्ण आढळले आहेत. पालिकेने या १० रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवले आहे. या प्रवाशांच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात येत आहे. हे सर्व प्रवासी कोविडबाधित असले तरी लक्षणेविरहित आहेत. सर्वांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंग चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
दक्षिण आफ्रिकेसह इतर अति जोखमीच्या देशांतून आलेल्या एकूण ४८५ प्रवाशांच्या चाचण्या मुंबई महापालिकेतर्फे करण्यात आल्या. यापैकी ९ प्रवासी व कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेला एक असे १० जण पाॅझिटिव्ह आढळले आहेत. कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या प्रवाशांची जीनोम सिक्वेन्सिंग चाचणी केली जाणार आहे. शिवाय नव्या विषाणूची माहिती देणारी ‘एस-जिन’ चाचणीही केली जाणार आहे. या ‘एस-जिन’ चाचणीचा रिपोर्ट शुक्रवारी येण्याची शक्यता आहे. या चाचणीमुळे नव्या व्हेरिएंटची शक्यता आणि जीनोम सिक्वेन्सिंग चाचणी व पुढील कार्यवाही करण्यासाठी दिशा मिळणार आहे.
द. आफ्रिकेतून आलेल्या कोरोना ओमायक्रॉन विषाणूचा महाराष्ट्रात प्रवेश रोखण्यासाठी राज्य सरकारने गुरुवारी परदेशी प्रवाशांसाठी सुधारित नियमावली जारी केली. केंद्र आणि राज्याच्या नियमावलीत तफावत असल्याने केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्य सरकारला चांगलेच फटकारल्याने गुरुवारी राज्य सरकारने तातडीने सुधारित नियमावली जारी केली.
राज्याकडून बुधवारी जारी नियमावलीत परदेशी प्रवाशांसाठी आरटीपीसीआर तसेच निगेटिव्ह रिपोर्ट आल्यानंतरही १४ दिवसांचे घरगुती विलगीकरण याबाबत उल्लेख नव्हता. ओमायक्रॉनवर परदेशी प्रवाशांसाठी केंद्र सरकारनेही बुधवारी नियमावली केली होती, मात्र केंद्राची नियमावली व राज्य सरकारच्या नियमावलीत मोठी तफावत असल्याने केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्य सरकारला चांगलेच फटकारले होते. राज्याचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांना पाठवलेल्या पत्रात केंद्राच्या नियमावलीचे कठोर पालन करण्यात यावे, असे आदेश देण्यात आले होते.