Home Covid-19 #Maharashtra । प्रवाशांसाठी नवीन नियमावली जाहीर; दक्षिण आफ्रिकेसह 11 देशांना हाय रिस्क...

#Maharashtra । प्रवाशांसाठी नवीन नियमावली जाहीर; दक्षिण आफ्रिकेसह 11 देशांना हाय रिस्क यादीत टाकले

575

राज्यात ओमायक्रॉनचे आणखी दोन रुग्ण मुंबईत आढळले आहेत. त्यामुळे आता राज्यातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या दहा झाली आहे. डोंबिवली आणि पुण्यानंतर आता मुंबईत देखील ओमायक्रॉनने शिरकाव केल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार, आज मुंबईतील दोन जणांना ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झाल्याची माहिती आहे.

त्यामुळे महाराष्ट्रातील ओमायक्रॉन विषाणू आढळलेल्या रुग्णांची संख्या आता 10 झाली आहे. ओमायक्रॉन रुग्णाची वाढती संख्या पाहाता आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी राज्य सरकारने प्रवाशांसाठी नवीन नियमावली जारी केली आहे. राज्य सरकारकडून दक्षिण आफ्रिकासह 11 देशांना हाय रिस्कमध्ये ठेवण्यात आले आहे. या देशांतून येणाऱ्या प्रवाशांसाठी कठोर नियमावली जारी करण्यात आली आहे.

30 नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या नियमावलीमध्ये राज्य सरकारने सुधारणा केली आहे. 30 नोव्हेंबर रोजी दोन देशांना हाय रिस्कमध्ये ठेवण्यात आले होते. याची संख्या आता 11 करण्यात आली आहे. सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांना RT-PCR चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. जर या चाचणीमध्ये ओमायक्रॉनची बाधा झाल्याचा रिपोर्ट आला तर सक्तीचे क्वारंटनाईन करण्यात आले आहे. तसेच संबधित नियमांनुसार उपचार घ्यावे लागतील. निगेटिव्ह येईपर्यंत सर्व नियमांनुसार उपचार घ्यावे लागतील. प्रवाशाची चाचणी निगेटिव्ह आली तर सात दिवसांचे होम क्वारंटनाईन करण्यात येईल. त्यानंतर आठव्या दिवशी पुन्हा कोरोनाची RT-PCR चाचणी करण्यात येईल. जर निगेटिव्ह रिपोर्ट आला तर पुढील सात दिवस होम क्वारटाईन व्हावे लागणार आहे.

हाय रिस्क देशाची यादी
  • 1. दक्षिण आफ्रिका
  • 2. युरोप आणि युके
  • 3. ब्राझिल
  • 4. बोत्सवाना
  • 5. मॉरिशिअस
  • 6. न्यूझीलंड
  • 7. सिंगापूर
  • 8. हाँगकाँग
  • 9. झिम्बॉबे
  • 10. इस्राइल
  • 11. चीन

मुंबईत ओमायक्रॉनचे दोन नवे रुग्ण आढळले आहेत. दक्षिण आफ्रिकातून 25 नोव्हेंबर रोजी मुंबईत आलेल्या 37 वर्षीय व्यक्तीला ओमायक्रॉन विषाणूची लागण झाली आहे. या व्यक्तीसोबत राहिलेल्या आणि अमेरिकेतून आलेल्या 36 वर्षीय व्यक्तीलाही ओमायक्रॉन विषाणूची लागण झाल्याचे प्रयोगशाळा अहवालातून समोर आले आहे.

मुंबईत आढळलेल्या दोन्ही रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नाहीत, हे दोन्ही रुग्ण सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार घेत आहेत. या दोन्ही रुग्णांनी फायझर या लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत.

शनिवारी डोंबविलीमध्ये ओमायक्रॉनचा एक रुग्ण आढळला होता. त्यानंतर रविवारी पिंपरी चिंचवडमध्ये सहा तर पुण्यात एक रुग्ण आढळला आहे. त्यानंतर आज मुंबईत दोन रुग्ण सापडल्याने राज्यातील ओमायक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णाची संख्या दहावर पोहचली आहे.

पुण्यातील पिंपरी चिंचवडमधील एकाच कुटुंबातील सहा जणांना ओमायक्रॉन या विषाणूची लागण झाली आहे. 24 नोव्हेंबर रोजी नायजेरियातून भावाला भेटण्यासाठी आलेल्या 44 वर्षीय महिलेला, तिच्यासोबत आलेल्या दोन मुलींना ओमायक्रॉनची लागण झाली आहे.

त्याशिवाय त्या महिलेचा भाऊ आणि त्याच्या दोन्ही मुलींनाही ओमायक्रॉनची लागण झाली आहे. सर्वांना कोरोनाची सौम्य लक्षणे असून पिंपरी-चिंचवडमधील जिजामाता रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. ओमायक्रॉन व्हेरियंटच्या सहा रुग्णापैकी तीन जण 18 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत.