Home Covid-19 #Omicron । ओमायक्रॉनचे मुंबईत तीन, पिंपरी-चिंचवडमध्ये चार रुग्ण; राज्यात एकूण 17 ओमायक्रॉन...

#Omicron । ओमायक्रॉनचे मुंबईत तीन, पिंपरी-चिंचवडमध्ये चार रुग्ण; राज्यात एकूण 17 ओमायक्रॉन रुग्ण

525
ओमायक्रॉन संसर्गाचे राज्यात शुक्रवारी (ता. १०) आणखी ७ रुग्ण आढळले. यात मुंबईत ३ तर पिंपरी – चिंचवड शहरात ४ रुग्णांचा समावेश आहे. राज्यात आजवर एकूण १७ ओमायक्रॉन विषाणू बाधितांची संख्या झाली आहे.

मुंबईत आढळलेले ३ रुग्ण हे ४८, २५ आणि ३७ वर्षाचे पुरुष असून, त्यांनी अनुक्रमे टांझानिया, इंग्लंड आणि दक्षिण अफ्रिका या देशांमधून प्रवास केलेला आहे. तर, पिंपरी – चिंचवडमध्ये आढळलेले ४ ही रुग्ण नायजेरियावरून आलेल्या व ओमायक्रॉन बाधित आढळेलेल्या महिलेचे नातेवाईक आहेत. आढळलेल्या ७ रुग्णांपैकी ४ जणांचे लसीकरण पूर्ण आहे. एका रुग्णाने लसीचा एक डोस घेतला आहे, तर एकाचे लसीकरण झालेले नाही. एका रुग्णाचे वय साडे तीन वर्ष असल्याने लसीकरण झालेले नाही. ४ रुग्ण लक्षणेविरहित आहेत तर, ३ रुग्ण सौम्य स्वरुपाचे आहेत.

राज्यात १ डिसेंबरपासून अतिजोखमीच्या ११ देशातून ९ हजार ६७८ प्रवासी तर इतर देशातून ५१ हजार ७६१ असे एकूण ६१ हजार ४३९ प्रवासी राज्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

सुमारे ८९ नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले

अतिजोखमीच्या देशातून आलेल्या सर्व ९६७८ प्रवाशांची तर इतर देशातून आलेल्या १२४९ अशा एकूण १० हजार ९२७ प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी केली आहे. त्यातील अतिजोखमीच्या देशातून आलेल्या व कोरोनाबाधित असलेल्या २० प्रवाशांची तर इतर देशातून आलेल्या पण कोरोना संसर्ग झालेल्या ५ अशा एकूण २५ रुग्णांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. परदेशातून आलेले व राज्यातील बाधितांमधील एकूण ८९ नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठविण्यात आले आहेत.