कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाइन घेण्यात आल्या. मात्र, परिस्थितीत सुधारणा झाल्यानंतर पुन्हा ऑफलाइन परीक्षा घ्याव्या लागणार आहेत. महाविकास आघाडी सरकारचीही हीच भूमिका आहे, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी येथे स्पष्ट केले. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) ऑफलाइन परीक्षा घेण्याबाबच्या कोणत्याही सूचना परिपत्रकाद्वारे दिल्या नसून, परिपत्रक बनावट असल्याचेही त्यांनी सांगितले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभानंतर सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी परीक्षा, वसतिगृह आणि शुल्काबाबत माहिती दिली. ते म्हणाले, राज्यातील विद्यापीठांना परीक्षा घेण्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन असे दोन्ही पर्याय दिले आहेत. जिह्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असतात. त्यांच्याशी चर्चा करून परीक्षांचे आयोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
यापूर्वी कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतल्या होत्या. विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळण्यासाठी ऑनलाइन परीक्षा घेण्यात आल्या, असे म्हणणे योग्य नाही. राज्य सरकार कायमस्वरूपी ऑनलाइन परीक्षा घेणार, असा गैरसमज कोणी पसरवत असतील, तर ते चुकीचे आहे. आगामी दिवसांत ऑफलाइन परीक्षांकडे आपल्याला वळावे लागणार असून, सरकारची देखील तीच भूमिका आहे, असे सामंत यांनी स्पष्ट केले.
राज्यातील विद्यापीठांमध्ये कमवा आणि शिका (अर्न अॅड लर्न) ही योजना सुरू आहे. मात्र, शेतकऱ्यांची मुले, गोरगरीब विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून ही योजना मोठ्या प्रमाणात राबवण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय मार्च महिन्यातील अधिवेशनात होईल, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी येथे दिली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पदवीप्रदान सोहळ्यात ते बोलत होते.ऑस्ट्रेलियन कॉन्सुलेट जनरल पीटर ट्रसवेल म्हणाले, सध्या जग मोठ्या अनिश्चिततेतून जात आहे. परंतु “इनोव्हेशन’ च्या माध्यमातून वेगाने बदलणाऱ्या जगात अनेक नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.
वसतिगृहे सुरू करण्याच्या निर्णय उच्चशिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांच्या अध्यक्षतेखालील समितीने घेतला होता. मात्र, गेल्या आठ दिवसांत कोरोनाचा ओमायक्रॉन हा नवा उपप्रकार आला आहे. या नव्याने उद्भणाऱ्या परिस्थितीबाबत तज्ज्ञांशी चर्चा सुरू आहे. आता वसतिगृहे सुरू केल्यानंतर दुर्दैवाने तिसरी लाट आल्यावर पुन्हा क्वाॅरंटाइन सेंटर सुरू करावी लागणार आहेत. त्यामुळे जागा उपलब्ध करून देणे शक्य होणार नाही. त्यामुळे सध्या आम्ही शांतपणे एकूण परिस्थितीचा विचार करून निर्णय घेणार आहोत.