Home Maharashtra 230 एसटी कर्मचाऱ्यांना दिल्या बडतर्फीच्या नोटिसा, महामंडळाने संपकऱ्यांवर उगारला कारवाईचा बडगा

230 एसटी कर्मचाऱ्यांना दिल्या बडतर्फीच्या नोटिसा, महामंडळाने संपकऱ्यांवर उगारला कारवाईचा बडगा

484

राज्य परिवहन महामंडळ (एसटी) कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्यासाठी शेवटची संधी (अल्टिमेटम) देऊनही बहुतांश कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर अखेर मंगळवारी बडतर्फीची कारवाई सुरू करण्यात आली. पहिल्याच दिवशी २३० कर्मचाऱ्यांना बडतर्फीच्या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.

परिवहनमंत्री अॅड. अनिल परब यांनी दापोली येथे माध्यमांना ही माहिती दिली. ८ नोव्हेंबर रोजी राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले. वेतनवाढ आणि विलीनीकरण या दोन प्रमुख मागण्यांवर कर्मचारी ठाम होते. सरकारने २४ नोव्हेंबर रोजी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा निर्णय जाहीर केला. तरी संप चालूच आहे.

महामंडळाने आजपर्यंत १० हजार १८० कर्मचाऱ्यांचे निलंबन केले असून रोजंदारीवरील २ हजार २९ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केली आहे. तसेच २ हजार २५० कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. मंगळवारी एसटीचे २१ हजार ६४४ कर्मचारी कामावर होते. संपात अजूनही ६७ हजार ९०४ कर्मचारी सहभागी आहेत. मंगळवारी २५० पैकी १२२ आगार चालू होते.