मिस वर्ल्ड 2021 ची अंतिम फेरी कोरोनामुळे तात्पुरती पुढे ढकलण्यात आली आहे. या स्पर्धेत भारताते प्रतिनिधित्व करणारी मानसा वाराणसी हिच्यासह अन्य 16 स्पर्धकांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आयोजकांनी हा निर्णय घेतला आहे. अंतिम फेरी सुरू होण्याच्या काही तास आधी पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा करण्यात आली.
पोर्तो रिको कोलिझियम जोस मिगुएल ऍग्रेलॉट येथे पुढील 90 दिवसांत ही अंतिम फेरी पुन्हा आयोजित करण्यात येणार आहे.
स्पर्धकांना क्वारंटाइन ठेवण्यात आले आहे
आयोजकांनी अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, मिस वर्ल्ड 2021 च्या स्पर्धक, कर्मचारी, क्रू आणि सामान्य लोकांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर पोर्तो रिकोमधील अंतिम फेरी तात्पुरती पुढे ढकलण्यात येत आहे. ही अंतिम फेरी पुढील 90 दिवसांत पोर्तो रिको कोलिझियम जोस मिगुएल ऍग्रेलॉट येथे आयोजित करण्यात येणार आहे. स्पर्धक, प्रॉडक्शन टीम आणि प्रेक्षकांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व बाधितांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
फायनलबाबत आयोजकांना आशा आहे
मिस वर्ल्ड लिमिटेडच्या सीईओ ज्युलिया मोर्ले यांनी सांगितले की, आम्ही या स्पर्धेसाठी आमचे स्पर्धक आणि कर्मचारी परत येण्याची वाट पाहत आहोत. जेव्हा मोर्ले यांना विचारले गेले की, स्पर्धेतील सहभागी त्यांच्या देशात कधी परत येऊ शकतात, तेव्हा त्या म्हणाल्या की, आरोग्य अधिका-यांनी परवानगी दिल्यानंतर स्टाफ आणि स्पर्धक त्यांच्या देशात परत जाऊ शकतील.