Home मराठी #Wardha | वडील श्वानाने रक्तदान करून वाचविले सात महिन्यांच्या पिल्लाचे प्राण

#Wardha | वडील श्वानाने रक्तदान करून वाचविले सात महिन्यांच्या पिल्लाचे प्राण

491

वर्धा ब्युरो : गोचडीपासून पसरणारा आजार अशी इहर लिचियाची (Ihar Lichia) ओळख. रॉटव्हीलर (Rottweiler) प्रजातीच्या ओरिओ नामक श्वानाला याची लागण झाली. ओरिओची हिमोग्लोबीन पातळी चारपर्यंत खाली आली होती. ओरिओ मृत्यूशी झुंज देत होता. त्यामुळं त्याला त्याचे वडील असलेल्या रुद्र नामक श्वानाचे रक्त (Father dog donates blood ) देण्यात आले.

गोचडीपासून पसरणारा इहर लिचिया आजार

वर्धा येथील लेनीन कांबळे यांच्या मालकीच्या रॉटव्हीलर प्रजातीच्या ओरिओ नामक श्वानाची प्रकृती अचानक ढासळली. ओरिओला पशू चिकित्सकांकडं उपचारासाठी नेण्यात आले. विविध चाचण्या केल्यावर ओरिओला गोचडीपासून पसरणाऱ्या इहर लिचिया नामक आजाराची लागण झाल्याचं पुढं आलं. अशातच ओरिओची हिमोग्लोबीन पातळी थेट चारपर्यंत खाली आली. त्यामुळं त्याला रक्त देण्याची गरज होती.

श्वानाच्या मालकीने दिली सहमती

दरम्यान याची माहिती रॉटव्हीलर प्रजातीच्या रुद्र नामक श्वानाचे मालक कुबल भाकरे यांना देण्यात आली. त्यांनी रुद्रचे रक्तदान करून ओरिओचे प्राण वाचविण्यासाठी सहमती दर्शविली. त्यानंतर डॉ. संदीप जोगे यांच्या नेतृत्त्वात मृत्यूशी झुंज देत असलेल्या ओरिओला त्याचे वडील असलेल्या रुद्रचे रक्त देऊन जीवनदान देण्यात आले.

ॲग्ल्यूटिनेशन टेस्टनंतर देण्यात आले रक्त

मृत्यूशी झुंज देत असलेल्या ओरिओला ॲग्ल्यूटिनेशन टेस्टनंतर (Agglutination test) ब्लड ट्रांसफ्यूजन पद्धतीचा वापर करण्यात आला. रुद्र नामक श्वानाचे रक्त देण्यात आले. या प्रक्रियेसाठी डॉ. संदीप जोगे यांना दीप जगताप, रोहित दिवाने, विशाल मानकर यांनी मदत केली.

रुद्रने यापूर्वीही केले होते रक्तदान

गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या माऊली नामक श्वानाला यापूर्वी रुद्र नामक श्वानानेच रक्तदान करून जीवदान दिले होते. त्यावेळी माऊली नामक श्वानाची हिमोग्लोबीन पातळी दोनपर्यंत आली होती, हे विशेष. रॉटव्हीलर प्रजातीच्या रुद्र श्वानाने रक्तदान करून सात महिन्यांच्या पिल्लाचे प्राण वाचविले. इहर लिचिया आजारामुळं ओरिओ नामक श्वानाची हिमोग्लोबीन पातळी चार झाली होती. अशा परिस्थितीत मृत्यूशी झुंज देणाऱ्या ओरिओला त्याचे वडील असलेल्या रुद्र या श्वानानं रक्त देऊन जीवनदान दिलं.