Home Covid-19 कोरोनाची तिसरी लाट नववर्षाच्या सुरुवातीस येणार; फेब्रुवारीत पीक शक्य

कोरोनाची तिसरी लाट नववर्षाच्या सुरुवातीस येणार; फेब्रुवारीत पीक शक्य

511

सुपरमॉडेल पॅनलचा दावा : ओमायक्रॉन डेल्टा व्हेरिएंटची जागा घेईल

ओमायक्रॉनमुळे भारतात कोरोनाची तिसरी लाट येईल, असा दावा नॅशनल कोविड-१९ सुपरमॉडेल समितीने केला आहे. येत्या फेब्रुवारीत तिसऱ्या लाटेचा पीक (सर्वोच्च पातळी) येण्याची शक्यता आहे. समितीचे प्रमुख एम. विद्यासागर शनिवारी म्हणाले, ‘ओमायक्रॉन जसजसा डेल्टा व्हेरिएंटची जागा घेत जाईल तसतसे रुग्ण वाढत जातील. तिसरी लाट पुढील वर्षाच्या सुरुवातीस येऊ शकते. देशात लोकांत मोठ्या प्रमाणात इम्युनिटी असल्याने ही लाट दुसऱ्या लाटेपेक्षा कमी घातक असेल.’ आयआयटी हैदराबादचे प्रो. विद्यासागर म्हणाले, आधीच्या तुलनेत तिसऱ्या लाटेत राेजचे रुग्ण कमीच असतील. सर्वात भीषण स्थितीतही रोजचे रुग्ण दोन लाखांपेक्षा जास्त नसतील. दरम्यान, लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयाचे एमडी डॉ. सुरेशकुमार यांच्यानुसार, दिल्लीत आढळलेल्या २० ओमायक्रॉन रुग्णांपैकी १८ जणांत कोणतीही लक्षणे नाहीत.

कर्नाटकात शनिवारी ६ नवे ओमायक्रॉनबाधित रुग्ण आढळले आहेत. एकूण बाधितांचा आकडा १४ झाला आहे. या ६ पैकी ५ रुग्ण दोन शिक्षण संस्थांतील आहेत. हा क्लस्टर आऊटब्रेक समजण्यात आला आहे.

युगांडातून ९ डिसेंबरला महाराष्ट्रात परतलेले दांपत्य आणि त्यांच्या १३ वर्षीय मुलीत ओमायक्रॉन व्हेरिएंट आढळला आहे. त्यांची ५ वर्षीय मुलगीही पाॅझिटिव्ह आहे. मात्र तिच्यात आेमायक्राॅन व्हेरिएंट नाही.

तामिळनाडूने केंद्र सरकारला आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या काेरोना टेस्टबाबत जारी मागदर्शक तत्त्वे बदलण्याची विनंती केली आहे. राज्यात बिगर जोखमीच्या देशातून आलेल्या प्रवाशात ओमायक्रॉन संसर्ग आढळला आहे. हा राज्यातील पहिलाच रुग्ण आहे. तामिळनाडूत येणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कोविड-१९ चाचणी करण्याची परवानगी देण्याची मागणी राज्याने केली आहे. आजवर फक्त जोखमीच्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांचीच सक्तीची चाचणी केली जाते. राज्यात शुक्रवारपर्यंत २८ आंतरराष्ट्रीय प्रवासी आले. त्यात ओमायक्रॉन व्हेरिएंटचा संकेत देणारा ‘एस’ जीन ड्रॉप आढळला आहे.