मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठणठणीत असून मुख्यमंत्र्यांवरील वैद्यकीय उपचारादरम्यान राज्याचा कारभार जराही थांबलेला नव्हता, असे स्पष्ट करून मुख्यमंत्री आपल्या पदाचा कारभार काही काळ शिवसेनेच्या ज्येष्ठ मंत्र्यांकडे सोपवणार असल्याच्या चर्चेला शिवसेना नेते व राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पूर्णविराम दिला. देसाई यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राज्यातील उद्योगांची भाजपने पळवापळवी केली, असा गंभीर आरोप केला.
मुख्यमंत्री आजारी असल्याने राज्याच्या कारभारात काहीही फरक पडलेला नाही. मुख्यमंत्री मंत्रीमंडळ बैठकांमध्ये नेहमी असतात. मुख्यमंत्री निर्णय घेत असून फाईलींचा निपटाराही करत आहेत. बुधवारपासून प्रारंभ होत असलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री सहभागी होतील, असे देसाई यांनी सांगितले.
राज्याला गतवैभव मिळवून देण्यास राज्यातील मविआ सरकार अपयशी ठरले आहे, या केंद्रीय मंत्री अमीत शहा यांनी परवा पुण्यात केलेल्या आरोपांवर देसाई म्हणाले, शहा यांना योग्य ते उत्तर आमचे नेते देतील. परंतु महाराष्ट्राच्या वैभवाची शाहांना दखल घ्यावीशी वाटत असेल तर राज्यातले उद्योग केंद्राकडून आणि गुजरातकडून पळवले जात आहेत. ते आधी थांबवा, असे ते म्हणाले.
अभिजात मराठीसाठी केंद्राचे सगळे निकष यावर अहवाल सादर केला. आहे. सर्व शंकाचे निरसन केले आहे. सगळे पुरावे सादर केल्याचे देखील भाषा विभागाने सांगितले. ६ भाषांना दर्जा दिला मग मराठीसाठी विलंब का ? असा सवाल देसाई यांनी केला.
केंद्रने राज्यातील २ महाविद्यालयांना मंजुरी दिली आहे. मात्र उत्तर प्रदेशात २७ महाविद्यालयांना मंजुरी दिली. जीएसटीचे ६ हजार ३४० कोटी राज्याची थकबाकी असल्याचे सांगून महाराष्ट्रासाठी इतका दुजाभाव का ?, असा सवाल देसाई यांनी केला. शिवसेना नेते रामदास कदमांची पक्ष दखल घेईल. ते नेते आहेत. गंभीर मुद्दे असतील तर गंभीर दखल घेतली जाईल, असा दावा देसाईंनी केला. आमचे प्रेम तीन चाकीवरच जास्त आहे, असे देसाई यांनी या वेळी सांगितले.
मुख्यमंत्री आजारी असल्याने मुख्यमंत्रीपदाचा कारभार शिवसेनेच्या ज्येष्ठ मंत्र्यांकडे म्हणजे तुमच्याकडे सोपवण्याचा शिवसेनेत विचार चालु असल्याची चर्चा आहे, ते खरे आहे का, प्रश्न देसाई यांना विचारला असता. सोशल मीडियावर कोण काय म्हणते, हे मला माहिती नाही, असे म्हणत देसाई यांनी हात जोडले.
Home मराठी मुख्यमंत्र्यांची प्रकृती ठणठणीत अधिवेशनात सहभागी होणार, उद्योगमंत्री सुभाष देसाईंचा निर्वाळा