Home मराठी राज्याला हुडहुडी; तीन दिवस राहणार कडाका, खान्देश-विदर्भात थंडीची लाट

राज्याला हुडहुडी; तीन दिवस राहणार कडाका, खान्देश-विदर्भात थंडीची लाट

595

उत्तर भारतात तीव्र थंडीची लाट आली असून उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्याला हुडहुडी भरली आहे. विदर्भातही थंडीची लाट असून थंड वाऱ्यामुळे उत्तर महाराष्ट्र चांगलाच गारठला आहे. स्थानिक नाेंदीनुसार, सोमवारी धुळे येथे सर्वात ५.५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागानुसार सध्या उत्तर भारतात तीव्र थंडीची लाट आहे. हरयाणा, पंजाब, राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेशपर्यंत ही लाट अतितीव्र स्वरूपात आहे. परिणामी राज्यातील उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातही थंडीच्या लाटेसारखी स्थिती आहे. आणखी तीन दिवस या लाटेचा परिणाम राहणार असून विदर्भासह उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील सरासरी किमान तापमान दोन ते तीन अंशांनी घसरण्याची शक्यता आहे.

या जिल्ह्यांना बसणार लाटेचा फटका : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अमरावती, नागपूर, वर्धा, बुलडाणा, औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, उस्मानाबाद आदी जिल्ह्यांत थंडीचा कडाका जास्त जाणवण्याची शक्यता आहे.

राज्यात सोमवारी किमान तापमानात लक्षणीय घट झाली. विदर्भात किमान तापमान सरासरीच्या तुलनेत ३ ते ५ अंशांनी घसरले. हवामान खात्यानुसार नागपुरात सर्वात नीचांकी ७.८ अंश तापमान हाेते.

राज्यातील प्रमुख शहरांचे किमान तापमान
  • नागपूर ७.८
  • नगर १०.१
  • जळगाव ८.७
  • नाशिक ११.४
  • सोलापूर १३.१
  • उस्मानाबाद ११.३
  • अकोला ११.३
  • अमरावती ८
  • वर्धा ९
  • बुलडाणा १०.५
  • पुणे ११.२
  • महाबळेश्वर १२.३
  • परभणी ११.५
  • नांदेड १३