Home कोरोना आज जाहीर होणार नवी नियमावली, राज्यात एकाच दिवसात आढळले 23 ओमायक्रॉनबाधित रुग्ण

आज जाहीर होणार नवी नियमावली, राज्यात एकाच दिवसात आढळले 23 ओमायक्रॉनबाधित रुग्ण

483

राज्यात वाढत्या कोविड रुग्णसंख्येकडे पाहता संसर्ग रोखण्यासाठी कशाप्रकारे निर्बंध लावता येतील यावर गुुरुवारी रात्री टास्क फोर्सच्या सदस्यांची बैठक झाली. व्हिसीद्वारे झालल्या या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. आगामी नाताळ, नववर्ष स्वागत असे प्रसंग लक्षात घेऊन कमीतकमी गर्दी कशी होईल तसेच विवाह समारंभ, पार्ट्या या अनुषंगाने हॉटेल्स आणि उपाहारगृहात होणाऱ्या गर्दीवर कसे निर्बंध लावता येतील यादृष्टीने विस्तृत चर्चा करण्यात आली. याबाबत शुक्रवार, २४ डिसेंबर रोजी नवी नियमावली जाहीर करण्यात येणार आहे.

दरम्यान, मध्य प्रदेशने गुरुवारी रात्रीपासूनच नाइट कर्फ्यू लावला आहे. महाराष्ट्रातही अशीच पावले उचलण्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी दिले. १६ राज्यांत ओमायक्रॉन रुग्णांची संख्या गुरुवारी ३२५ वर पोहोचली. सर्वाधिक ३३ रुग्ण तामिळनाडूत आढळले. नायजेरियाहून परतलेल्या ओमायक्रॉन रुग्णाच्या संपर्कात आल्याने ३३ जणांना संसर्ग झाला आहे. महाराष्ट्रातही गुुरुवारी रुग्णसंख्या २३ ने वाढून ८८ वर पोहोचली आहे.

दरम्यान, यूपीतील विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या लाटेपासून जनतेला वाचवण्यासाठी राजकीय पक्षांच्या सभांवर बंदी आणा, असा आग्रह अलाहाबाद हायकोर्टाने निवडणूक आयोगाकडे केला आहे. कोर्टाने पंतप्रधांनानाही निवडणुका लांबणीवर टाकण्याबाबत विचार करण्याची विनंती केली आहे.

महाराष्ट्रात गुरुवारी ओमायक्रॉनबाधित २३ नवे रुग्ण आढळले आहेत. उस्मानाबादच्या मोहा येथे घाना देशातून आलेल्या बापलेकाचा अहवाल गुरुवारी मिळाला. त्यात दोघांनाही ओमायक्रॉनची लागण झाल्याचे समोर आले. राज्यातील एकूण रुग्णसंख्या ८८ वर गेली आहे. दरम्यान, गुरुवारी राज्यात कोरोनाचे ११७९ नवे रुग्ण आढळले, तर १७ जणांचा मृत्यू झाला.

उपमुख्यमंत्र्यांचा इशारा : राज्यात रात्रीचा लाॅकडाऊन लावण्यावर गांभीर्याने विचार सुरू असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी विधानसभेत सांगितले. आपल्याकडे सर्वत्र ओमायक्राॅनचे रुग्ण सापडत आहेत. विधिमंडळात आमदारच जर मास्क लावत नसतील तर त्यांना सदनाच्या बाहेर काढा, अशी विनंती पवार यांनी अध्यक्षांना केली.

1. इम्पिरियल कॉलेज लंडनच्या अभ्यासानुसार, डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉन रुग्णांना रुग्णालयात भरती करण्याची शक्यता १५% कमी आहे. एक रात्र व जास्त वेळ भरती राहण्याची शक्यता ४०% कमी आहे. प्रो. नील फर्ग्युसन म्हणाले, रुग्णांची संख्या वाढू शकते, मात्र ते गंभीर होणार नाहीत. ते होम आयसोलेशनमध्ये बरे होऊ शकतात.
2. द. आफ्रिका, स्कॉटलंड व इंग्लंडमध्ये शास्त्रज्ञांच्या ३ टीमने संशोधनाअंती सांगितले की, ओमायक्रॉनमुळे लोक सौम्य लक्षणांसह आजारी पडतात. यामुळे आेमायक्रॉनचा भयावह नसेल अशी आशा आहे. एमोरी विद्यापीठातील बायोस्टॅटिस्टियन नताली डीननुसार ओेमायक्रॉनचा संसर्ग जास्त फैलावेल, मात्र रुग्णांत गंभीर लक्षणे नसतील.
3. दिल्लीचे सीएम केजरीवाल म्हणाले, वाढत्या रुग्णांमुळे राजधानीत दररोज ३ लाखांपर्यंत चाचण्यांची क्षमता वाढवली आहे. होम आयसोलेशन मॉड्यूलमध्येही आणखी सुधारणा करण्यात आली आहे.

कोरोनाशी लढाई अजून थांबलेली नाही, सतर्क अन् सावधान राहा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशभरातील कोविड स्थितीचा आढावा घेतला. ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गाबाबत चिंता पाहता सायंकाळी त्यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली. यात ज्येष्ठ अधिकारी आणि तज्ञ सहभागी झाले. तासभर चाललेल्या या बैठकीत मोदींनी कोविड मार्गदर्शक नियमांचे काटेकोर पालन करण्यावर भर दिला. ते म्हणाले, ही लढाई अजून थांबलेली नाही. आपल्याला सतर्क आणि सावधान राहावे लागेल. ज्या राज्यांत लसीकरण कमी आहे, रुग्ण वाढत आहेत, आरोग्य सुविधा पुरेशा नाहीत अशा राज्यांत पथके पाठवावीत, अशी सूचनाही अधिकाऱ्यांना केली. पात्र नागरिकांना कोरोना प्रतिबंधक दोन्ही डोस देण्यावर राज्यांनी भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.