एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत मुंबई हायकोर्टात आज पुन्हा सुनावणी झाली. वकील गुणरत्न सदावर्ते यांनी कोर्टात संपकरी कर्मचाऱ्यांची रोखठोकपणे बाजू मांडली. न्यायमूर्ती प्रसन्न वराडे आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी झालेल्या युक्तीवादात महामंळाच्या वकिलांनी देखील भूमिका मांडली. या सुनावणीवेळी कोर्टात राज्य शासनाने गठीत केलेल्या समितीचा प्राथमिक अहवालाचे वाचन करण्यात आले. त्यानंतर दोन्ही बाजूने युक्तीवाद झाला.
अखेर ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 5 जानेवारीला होईल, असे कोर्टाने स्पष्ट केले. दरम्यान, कोर्टाने म्हटले की, एसटी कामगारांवर कोर्टाचा अवमान केल्याबद्दल कारवाई सुरु करण्यापूर्वी त्यांची बाजू मांडण्याची संधी द्यावी. एसटी कर्मचाऱ्यांची बाजू माडतांना सदावर्ते म्हणाले, सध्या विद्यार्थांचे कोणतेही नुकसान होत नाही. कारण सध्या शाळा नाताळच्या सुट्टीसाठी बंद आहेत. त्यामुळे कुठल्याही, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे नुकसान नाही होत आहे. कुणाचेही नुकसान न व्हावे ही कामगारांची इच्छा आहे.
गुणरत्न सदावर्तेंनी एसटी कर्मचाऱ्यांची बाजू मांडत आहे. विलीनीकरणाशिवाय पर्याय नसल्याचेही सदावर्ते यांनी म्हटले आहे. तसेच एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजयकुमार गुजर यांच्याबद्दल माहिती देताना सदावर्ते म्हणाले- गुजर यांचा फोन बंद येत आहे. एसटी कर्मचाऱ्यांची अवस्था शेतकऱ्यांसारखीच झाली आहे, अशी माहिती सदावर्ते यांनी दिली आहे. तर संप अवैध्यरित्या सुरु असल्याचे सरकारी वकिलांनी म्हटले आहे.
राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी सोमवारी एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटल्याचा दावा केला आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा संप संपला असून, एसटीची वाहतूक पूर्ववत होईल, अशी घोषणा परब यांनी केली. तर, कामावर रूजू होणाऱ्या संपकरी कर्मचाऱ्यांवरील कारवाई मागे घेणार असल्याचेही परब म्हणले.
महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कामगार संघटनेने 4 नोव्हेंबरला एसटी महामंडळाला संप करत असल्याची नोटीस दिली होती. परिवहन मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर संघटनेचे अध्यक्ष अजयकुमार गुजर म्हणाले, एसटीचा संप मागे घेत आहोत. तसेत गुजर यांनी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आवाहन त्यांनी केले.
राज्यभरातील एसटी कर्मचारी संपावर आहेत. सरकार आणि एसटी संघटनेने संप मिटल्याची केलेली घोषणा एसटी कर्मचाऱ्यांना मान्य नाही. सरकारच्या घोषणेनंतरही अनेक शेकडो एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मुद्द्यावर आंदोलनाला बसले आहेत.