Home Covid-19 #Maharashtra । रात्री 9 ते सकाळी 6 जमावबंदी, कठोर निर्बंध लावण्याची वेळ...

#Maharashtra । रात्री 9 ते सकाळी 6 जमावबंदी, कठोर निर्बंध लावण्याची वेळ येऊ शकते : मुख्यमंत्री

521
राज्यातील वाढत्या कोविड संसर्गामुळे राज्य सरकारने काही निर्बंध लागू केले आहेत. ते शुक्रवारी मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत. शुक्रवारी विधिमंडळात संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी नव्या नियमावलीची घोषणा केली. त्यानुसार त्यानुसार राज्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत ही जमावबंदी असणार आहे.

ओमायक्रॉन विषाणूच्या प्रसाराचा वेग जास्त असल्याने सध्या काही प्रमाणात निर्बंध लावावेत, पुढील काळात प्रसार बघून अधिक निर्बंध लावण्याबाबत विचार व्हावा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले. सध्याच्या निर्बंधाचे स्वरूप हे प्राथमिक स्वरूपाचे आहे. ते आताच न लावल्यास भविष्यात अधिक कठोर निर्बंध लावण्याची वेळ येऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला.

ख्रिसमस उत्सव, लग्न समारंभ, नवीन वर्षाचे स्वागत यामुळे गर्दी वाढून संसर्गाचा धोका वाढण्याची मोठी शक्यता असल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ प्रमाणे संपूर्ण राज्यात काही अतिरिक्त निर्बंध लावण्याचे ठरवण्यात आले आहे.

असे आहेत निर्बंध :
  • विवाह सोहळ्यासाठी बंदिस्त जागेत १००, तर खुल्या जागेत २५० जणांनाच मुभा
  • – सर्व सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर रात्री ९ ते सकाळी ६ या वेळेत बंदी असेल. लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहांत एका वेळी उपस्थितांची संख्या १०० च्या वर नसेल. खुल्या जागेत ही संख्या २५० च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या २५% यापैकी जे कमी असेल ते.
  • – इतर सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठीही उपस्थितांची संख्या १०० च्या वर नसेल. खुल्या जागेत ही संख्या २५० च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या २५% यापैकी जे कमी असेल ते.
  • – इतर कार्यक्रमांसाठी आसनक्षमता निश्चित असलेल्या बंदिस्त जागेत क्षमतेच्या ५०%पेक्षा जास्त उपस्थिती नसेल. ती निश्चित नसलेल्या ठिकाणी २५% उपस्थिती असेल. अशा प्रकारचे सर्व कार्यक्रम खुल्या जागेत होत असतील तर क्षमतेच्या २५ टक्केपेक्षा जास्त उपस्थिती नसेल.
  • – क्रीडा स्पर्धा, खेळाचे समारंभ यासाठी कार्यक्रमस्थळाच्या आसनक्षमतेच्या २५ टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती नसेल.
  • – वरीलपैकी कोणत्याही प्रकारात न मोडणाऱ्या समारंभ किंवा कार्यक्रमात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण उपस्थितांची संख्या निश्चित करेल. असे करताना २७ नोव्हेंबरच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या आदेशाचे पालन होईल.
आपत्ती व्यवस्थापनास अधिकार

– उपाहारगृहे, जिम, स्पा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे या ठिकाणी क्षमतेच्या ५० टक्के उपस्थिती राहील. या सर्वांना त्यांची संपूर्ण क्षमता तसेच ५० टक्के क्षमतेची संख्या जाहीर करावी लागेल.
– याशिवाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन आवश्यतेनुसार अधिक कठोर निर्बंध लावता येतील. जनतेला निर्बंधाची माहिती द्यावी लागेल.

भारतात १८३ पैकी ८७ रुग्णांना दोन्ही डोस

१२१ रुग्ण (८३%) परदेशातून आले. ४४ रुग्ण (२७%) त्यांच्या संपर्कात आले होते. १८ रुग्णांना संसर्ग कुठून झाला, हे कळालेले नाही. ८७ रुग्णांचे लसीचे दोन्ही डोस झालेले होते. तिघांनी परदेशात बूस्टर डोसही घेतलेला होता. ७ रुग्णांनी लसीचा एकही डोस घेतलेला नव्हता. १६ रुग्ण लसीसाठी पात्र नव्हते. म्हणजेच त्यांचे वय १८ पेक्षा कमी आहे. ७३ रुग्णांच्या लसीकरणाची माहिती कळू शकलेली नाही. रुग्णांत ३९% महिला, तर ६१% पुरुष. ३०% रुग्णांमध्ये ओमायक्रॉनची लक्षणे, ७०% मध्ये लक्षणे नाहीत.

ओमायक्रॉनमुळे यूपीतील निवडणुकांबाबत पुढील आठवड्यात निर्णय होऊ शकतो. गुरुवारी अलाहाबाद हायकोर्टाने निवडणुका लांबणीवर टाकण्याची आग्रह केला होता. मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा म्हणाले, पुढील आठवड्यात स्थितीचा आढावा घेऊन योग्य निर्णय घेऊ. यूपीने शुक्रवारी नव्या निर्बंधांची घोषणा केली आहे. लग्नात २०० जणांनाच हजर राहता येईल. मात्र प्रचारसभांतील गर्दीबाबत निर्णय घेण्यात आला नाही.

जगात कोरोनाची चौथी लाट सुरू : केंद्र सरकार
  • जग कोरोनाच्या चौथ्या लाटेला सामोरे जात असल्याचे सांगत केंद्रीय आरोग्य मंत्रालय शुक्रवारी म्हणाले की, भारताला सतर्क राहावे लागेल. युरोप, उत्तर अमेरिका व आफ्रिकेत रुग्णवाढ होतेय. आिशयात नवे रुग्ण घटत असले तरी आपण सावध राहिले पाहिजे.
  • – यूपीत २५ डिसेंबरपासून नाइट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. लग्नसोहळ्यांत २०० जणांनाच परवानगी आहे.
  • – चंदीगड : लस घेतल्याविना सार्वजनिक जागी प्रवेश नाही, अन्यथा ५०० रुपयांचा दंड.
  • – गुजरातच्या ८ शहरांत नाइट कर्फ्यूची वेळ वाढली. तो रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत असेल.
  • – हरियाणात २०० वर लोक एकत्र येण्यास बंदी. रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत वाहतूक नाही.