ओमायक्रॉनबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता निर्बंध लावण्यात आले आहेत. ही वाढ अशीच कायम राहिली तर यापूर्वी प्रतिदिन ८०० मे. टन ऑक्सिजन लागल्यास लॉकडाऊन लावण्यात येत होता. यात घट करून ती प्रतिदिन ५०० मे. टन करण्याचा विचार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. उत्सवकाळात अधिक गर्दी होऊ नये यासाठी हे निर्बंध लावण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. युरोप, अमेरिका आदी देशांत संसर्गाचा दर दुप्पट होत आहे. हॉटेल, चित्रपटगृह व रेस्टॉरंट ५० टक्केच्या मर्यादेत उपस्थिती गरजेची आहे. खुल्या जागेत पन्नास टक्के, तर बंदिस्त सभागृहात पंचवीस टक्के उपस्थिती ठेवून कार्यक्रम करण्याचे आदेश दिले. प्रत्येकाने नियमाचे पालन करावे अशा सूचना दिलेल्या आहेत. प्रत्येकाने काळजी घेतल्यास सर्व रुग्णांना मदत होणार असल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले कोरोनाची रुग्णसंख्या दररोज ७०० वरून १४०० वर गेली आहे.
सध्या ओमायक्रॉन रुग्णांची संख्या १०० झाली आहे. हीच गती कायम राहिली तर सरकारला नाइलाजाने निर्बंध लावावे लागतील. तिसरी लाट येणार आहे व ती ओमायक्रॉनची असणार आहे, असा दावाही आरोग्यमंत्री टोपे यांनी केला. शाळा सुरू झाल्या असल्या तरी नवीन आदेशानुसार शाळा बंद करणे वा शाळा सुरू ठेवण्याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. राज्यातील शाळा सुरूच राहतील.
तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ८७ टक्के लोकांना पहिला डोस, तर ५७ टक्के लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. लसीकरणाचा वेग आणखी वाढवण्याची गरज आहे. रोज पाच ते सहा लाख जणांना लस देण्यात येत आहे.
कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा हळूहळू वाढ होत आहे. शनिवारी राज्यात १४८५ नव्या रुग्ण आढळले तर ७९६ कोरोनामुक्त झाले. १२ मृत्यूंची नोंद झाली. दोन ओमायक्राॅन रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत ११० ओमायक्रॉनबाधितांची नोंद झाली आहे.
औरंगाबादेत एक ५० वर्षीय प्रौढ व्यक्ती आणि दुबईहून आलेल्या तरुणाला ओमायक्रॉनची लागण झाली आहे. या दोघांचा जिनोम सिक्वेंसिग अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. इंग्लंडमध्ये स्थायिक २१ वर्षीय मुलगी मुंबईत आल्यानंतर तिचा जीनोम सिक्वेसिंग अहवाल पॉझिटिव्ह आला. तिच्या संपर्कात आलेल्या वडीलांनाही नंतर संसर झाला. तर त्यासोबतच दुबईतून आलेल्या सिडकोतील रहिवाश्याचा जिनोम सिक्वेन्सिंग अहवालदेखील पॉझिटिव्ह आला आहे.