Home मराठी व्हॉट्सॲपवर ई-पेपर्स प्रसारित करण्यास हायकोर्टाची बंदी, याचिकेवर दिल्ली हायकोर्टाने दिला आदेश

व्हॉट्सॲपवर ई-पेपर्स प्रसारित करण्यास हायकोर्टाची बंदी, याचिकेवर दिल्ली हायकोर्टाने दिला आदेश

586

दिल्ली हायकोर्टाने व्हॉट्सॲप ग्रुप्समार्फत ई-पेपर्स प्रसारित करण्यावर तत्काळ बंदी घातली आहे. ई-पेपर्स व्हॉट्सॲप ग्रुप्समार्फत बेकायदा पद्धतीने प्रसारित करण्याविरुद्ध भास्कर समूहाने दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायमूर्ती संजीव नरुला यांच्या पीठाने डीबी कॉर्प लिमिटेडच्या (दैनिक भास्कर समूह) बाजूने अंतरिम आदेश मंजूर केला. भास्करचे ई-पेपर्स प्रसारित करणाऱ्या व्हॉट्सॲप ग्रुप्सना ब्लॉक करावे किंवा ते बंद करावेत, असे निर्देश हायकोर्टाने व्हॉट्सॲपला दिले. आता या प्रकरणात २ मे २०२२ ला सुनावणी होईल. व्हॉट्सॲप ग्रुप्सचे जे ॲडमिन ई-पेपर्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अवैधरीत्या प्रसारित करत आहेत त्यांनाही दिल्ली हायकोर्टाने आपल्या आदेशात नोटीस जारी केली आहे. या व्हॉट्सॲप ग्रुप्सच्या अॅडमिनची ओळख त्यांच्या मोबाइल क्रमांकाद्वारे पटली आहे.

दिल्ली हायकोर्टाने केंद्रीय दूरसंचार विभाग आणि केंद्र सरकारलाही या प्रकरणात नोटीस जारी केली आहे. डीबी कॉर्पने दैनिक भास्कर समूहाचे कॉपीराइट आणि नोंदणीकृत ट्रेडमार्कचे उल्लंघन करत असलेल्या ग्रुप्सना ब्लॉक करण्यासाठी व्हॉट्सॲपलाही कायदेशीर नोटीस पाठवली आहे. विशेष म्हणजे दैनिक भास्कर समूह सबस्क्रिप्शन मॉडेलमार्फत आपली अधिकृत वेबसाइट आणि मोबाइल ॲपवर ई-पेपर्स पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देते. हे ई-पेपर्स पूर्वपरवानगीविना इतर माध्यमांवर किंवा प्लॅटफॉर्म्सवर प्रसारित करणे बेकायदेशीर कृत्य आहे.